पंजाब सरकारविरूद्ध शेतकर्‍यांचा निषेध

चंदीगडच्या सीमांवर अतिरिक्त बंदोबस्त : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

वृत्तसंस्था/ चंदीगड

शेतकरी संघटना आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यातील तणाव वाढला आहे. 30 हून अधिक शेतकरी संघटना चंदीगडकडे मोर्चा काढणार आहेत. या शेतकऱ्यांनी चंदीगडमध्ये आंदोलन छेडण्याची घोषणा केल्यानंतर अनेक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेतकरी संघटना संपूर्ण पंजाबमध्ये मान सरकारविरुद्ध निदर्शने करतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने पूर्ण व्यवस्था केली आहे. त्यांनी शेतकरी धोरण आणि 6 पिकांवर किमान आधारभूत किंमत लागू करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी चंदीगडकडे मोर्चा काढण्याच्या घोषणेमुळे पोलिसांनी चंदीगडकडे जाणाऱ्या 12 प्रवेशद्वारांवरील मार्ग वळवले आहेत. चंदीगडच्या सर्व सीमांवर सुमारे 2500 पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, चंदीगड पोलीस सतत पंजाब पोलिसांच्या संपर्कात आहेत. या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड पोलिसांनी वाहतूक नियमावलीही जारी केली आहे. सामान्य लोकांना चंदीगडमध्ये येण्यापूर्वी वळवलेल्या मार्गांची शहानिशा करण्याचे आवाहन केले आहे. अनेक मार्गावरील वाहतूक वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पंजाबला लागून असलेल्या चंदीगड सीमेवर बुधवारी दुपारच्या सुमारास अनेक किलोमीटर लांबीचा जाम दिसून येत होता.

Comments are closed.