शक्तिपीठ महामार्ग कदापिही होऊ देणार नाही! भरपावसात आजऱ्यात झाले सर्वपक्षीय आंदोलन

कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार करत आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. भरपावसात इरले डोक्यावर घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या पीडित शेतकऱयांच्या महिला आकर्षणबिंदू ठरल्या.

माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, कॉ. संपत देसाई, मुकुंदराव देसाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आजरा शहरात शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चा सुरू झाला. सरकारविरोधी घोषणा देत मोर्चा आजरा तहसील कार्यालयाजवळ आला.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, यापूर्वीही अनेक प्रकल्प झाले आहेत. त्या प्रकल्पांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र, शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारांसाठी होत असल्यामुळे गरज नसलेल्या शक्तिपीठ विरोधात ताकतीने सर्वजण एकसंध राहूया, असे आवाहन त्यांनी केले.

शेट्टी म्हणाले, शेतकऱयांनी कष्टाने सिंचनाखाली आणलेल्या जमिनी चोरांना देणार नाही. रस्त्यासाठी जमिनी जाणाऱयांनाच नव्हे, तर इतर शेतकऱयांनाही शक्तिपीठचा फटका बसणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन करून बॉक्साइट तस्करी करण्याचा डाव असणाऱया मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का, असा सवाल त्यांनी केला.

विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठाच्या समर्थनात सरकारने जमा केलेले सातबारा हे बाधित शेतकऱयांचे नाहीत. तर, अंबानीच्या पैशांच्या मोहासाठी राज्य सरकार अशा कागाळी करत आहे. जिह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. कॉ. संपत देसाई म्हणाले, शक्तिपीठाला जिह्यातील बारा तालुक्यांतून विरोध आहे. अशात आमदार शिवाजी पाटील शक्तिपीठ चंदगडमध्ये नेऊन शेतकऱयांना उद्ध्वस्त करत आहेत. शक्तिपीठ रद्द झाल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी कॉ. संजय तर्डेकर, तानाजी देसाई, राजेंद्र गड्डुय़ान्नावर, राहुल देसाई, प्रा. शिंत्रे कॉ. सम्राट मोरे, शिवाजी गुरव, अमर चव्हाण, कॉ. अतुल दिघे, संभाजी सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील, सत्यजित दिग्विजय कुराडे, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed.