पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन

बदलत्या हवामानाचा फटका तळा तालुक्यातील आंबा बागायतदारांना बसला. त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पीक विम्याचे पैसे हाती येतील अशी अपेक्षा होती. अधिकाऱ्यांनी आश्वासनही दिले होते. पण प्रत्यक्षात फुटकी कवडी मिळालेली नाही. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या १९ नव्हेंबरपासून तळा तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार आहेत.
आंबा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही वितरित झालेले नाही. यासंदर्भात कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली होती. कृषी आयुक्त, पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. ५ नोव्हेंबरपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. पण अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. सरकारने आपला शब्द पाळला नसल्याने तळा तालुक्यातील शेतकरी प्रचंड संतापले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या माध्यमातून हे शेतकरी आपला रोष व्यक्त करणार आहेत.

Comments are closed.