बळीराजा सुखावला; खरीप हंगामाच्या तयारीला वेग, रायगडात पाऊस आला; 37 अंशांवरून तापमान 31 अंशांपर्यंत उतरले
प्रचंड उष्माने हैराण झालेले रायगडकर चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत होते. अखेर तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर रायगडात पाऊस आला. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाचे जोरदार आगमन झाले. दिवसभरात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या दमदार एन्ट्रीने रायगड जिल्ह्याचा तापमानाचा पारा ३७ अंशांवरून ३१ अंशांपर्यंत उतरला. पावसाच्या आगमनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही सुटणार आहे. अलिबाग, पनवेल, कर्जत, खालापूर, उरण, पेण, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा या सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे.
पावसाच्या सरींसोबत हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्म्यापासून दिलासा मिळाला आहे. लहान मुलांनी तर मनसोक्त भिजत पहिल्या पावसाचा आनंद लुटला. समुद्राच्या खळाळणाऱ्या लाटांसोबत पर्यटकांनीही पावसाचे स्वागत केले. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे.
पहिल्याच पावसाने विजेचा खेळखंडोबा
वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी जोरदार कामे हाती घेतली होती. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विजेच्या तारांवरील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर, वीज वाहिन्या बदलण्यात आल्या. डीपीचे काम करण्यात आले होते. मात्र वीज वितरण कंपनीच्या या सर्व मेहनतीवर पहिल्याच पावसाने पाणी फेरले. पावसाच्या सरींबरोबर जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत आहे.
मोखाड्याची पाणीटंचाई संपुष्टात
आज सकाळपासून मोखाड्यात ढगांच्या गडगडाटात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे बळीराजा सुखावला असून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अखेर बळीराजाची प्रतीक्षा संपली असून मोखाड्यातील अनेक भागांत आज पावसाचा जोर वाढला. पावसामुळे अनेक गावपाड्यांची पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे.
Comments are closed.