अतिवृष्टीची नुकसानभरपाई न मिळाल्याने नांदेडात शेतकर्यांनी सरकारी वाहन फोडले

तालुक्यातील वासरी येथील अतिवृष्टी झालेल्या पिकांचे शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तहसीलदारांच्या वाहनाच्या काचा फोडून घोषणा दिल्या.
आज सोमवारी दुपारी मुदखेड तालुक्यातील शेतकरी साईनाथ संभाजी खानसोळे यांनी अतिवृष्टीत झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान न मिळाल्यामुळे ‘जय जवान जय किसान’ असा नारा देत तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या.
तहसीलदार आनंद देऊळगावकर हे तहसील कार्यालयात हजर असताना शेतकर्याने थेट वाहनावर दगड घालून काचा फोडल्या. या घटनेची माहिती समजताच तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी, कामकाजासाठी आलेले नागरिक यांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. सदर घटनेचा व्हिडिओ करून शेतकर्याने तहसीलदार यांच्या वाहनांना लक्ष्य करत ‘जय जवान जय किसान’ असे नारे देत गाडी फोडली.
तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती देताच सदर शेतकर्यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई चालू असल्याचे सांगण्यात आले. तहसीलदार यांचे वाहन फोडण्याची पहिलीच घटना मुदखेड येथे घडली आहे.

Comments are closed.