रक्ताचे पाट वाहतील; पण ‘शक्तिपीठ’ला जमीन देणार नाही, कोल्हापुरातील बैठकीत निर्धार
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून कोल्हापूर जिह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात आता थेट युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दि. 9 सप्टेंबरपासून कोल्हापूर जिह्यात शासनाकडून जमिनीची मोजणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील शेतकरी महामार्गाविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवारात रक्ताचे पाट वाहतील; पण शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज शासकीय विश्रामगृहात जिह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शेतकऱयांची बैठक पार पडली. यावेळी शेतकऱयांनी ‘आरपारच्या लढाई’चा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱयांनी आपल्या शिवारातील नांगरीच्या फाळाला धार लावून तयार ठेवावे. जर अधिकारी जबरदस्तीने शिवारात घुसले, तर याच नांगरीच्या फाळाच्या तलवारी करून आपल्या मायभूमीचे आणि शिवाराचे रक्षण करा. कोणत्याही अधिकाऱयाला शेतात पाऊल टाकू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या आंदोलनात महिलांनीही उडी घेतली आहे. 9 सप्टेंबरला मोजणी दिवशी प्रत्येक गावातील महिला शेतकरी स्वतः शिवारात ठाण मांडून बसणार आहेत. तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि पोलीस ताफा जरी आला, तरी त्यांना शिवारात पाय ठेवू दिला जाणार नाही, असा निर्धारही महिलांनी केला आहे.
या बैठकीस शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे निमंत्रक काम्रेड गिरीश फोंडे, विक्रांत पाटील, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, नामदेव यादव, भगवान पाटील, कृष्णात साबळे, अमित नाळे आदी उपस्थित होते.
9 सप्टेंबरला गावबंदी करणार
येत्या दि. 3 सप्टेंबर रोजी प्रत्येक गावात महामार्गाच्या शासकीय आदेशाची जाहीर होळी करून निषेध नोंदवणार. 7 सप्टेंबरला शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार. तर दि. 9 सप्टेंबर मोजणीच्या दिवशी गावबंदी आणि शिवारबंदी करून अधिकारी व पोलिसांना गावातच रोखले जाईल, असा निर्धार करण्यात आला.
Comments are closed.