झुबीन गर्ग खून खटल्यासाठी जलदगती न्यायालयाची नियुक्ती

बक्सर जिल्हा न्यायाधीशांकडे नेतृत्त्व : सुनावणी दररोज होणार

वृत्तसंस्था/गुवाहाटी

गुवाहाटी उच्च न्यायालयाने आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाची दररोज सुनावणी करण्यासाठी एका विशेष जलदगती सत्र न्यायालयाची नियुक्ती केली आहे. बक्सा जिह्याच्या जिल्हा न्यायाधीश शर्मिला भुयान या जलदगती न्यायालयाचे अध्यक्षस्थान भूषवतील. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी ही नियुक्ती केली आहे.

गेल्यावर्षी 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना झुबीन गर्ग यांचा मृत्यू झाला. झुबीन चौथ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी तिथे गेले होते. आसाम पोलीस सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करून स्थानिक न्यायालयात सात जणांना आरोपी म्हणून नाव देऊन आरोपपत्र दाखल केले होते. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाने या प्रकरणाच्या सुनावणीला गती देण्यासाठी गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती केली होती.

सिंगापूरमधील तपासात कटाचा संशय नाही

स्थानिक यंत्रणा सिंगापूरमध्येही स्वतंत्र तपास करत आहेत. तेथील कोरोनर कोर्टाने अलीकडेच कोणत्याही घातपाताची शक्यता फेटाळून लावताना झुबीन गर्ग दारूच्या नशेत होते आणि लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिल्यानंतर लाझारस बेटाजवळ समुद्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते.

आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी, त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी केली होती. शिक्षा सुनावल्याशिवाय या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये बुडून मृत्यू झाल्यापासून त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.