आणखी 5 विमानतळांवर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन सुविधा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शुभारंभ

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्र सरकारने प्रवाशांसाठी हवाईप्रवास आणखी सुलभ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन-ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ (एफटीआय-टीटीपी)ला आणखी 5 विमानतळांवर सुरू केला आहे. या योजनेच्या अंतर्गत भारतीय नागरिक आणि ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना इमिग्रेशन प्रक्रियेत दीर्घ रांगेपासून दिलासा मिळणार आहे आणि ते ई-गेटद्वारे लवकर क्लियरेंस मिळवू शकतील.

ही योजना सर्वप्रथम जुलै 2024 मध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू झाली होती. यानंतर मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूर, हैदराबाद, कोची आणि अहमदाबादमध्ये ती लागू करण्यात आली. आता या सुविधेला लखनौ, तिरुअनंतपुरम, तिरुचिरापल्ली, कोझिकोड आणि अमृतसर विमानतळावरही लागू करण्यात आले आहे. फास्ट ट्रॅक इमिग्रेशनद्वारे प्रवाशांना जलद, सुरक्षा आणि त्रासाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव मिळेल. आतापर्यंत 3 लाख लोकांनी  योजनेसाठी नोंदणी करविली आहे, ज्यातील 2.65 लाख प्रवाशांनी सुविधेचा लाभ घेतला आहे.

Comments are closed.