मुंबई विद्यापीठातील कॅन्टीनला एक लाखाचा दंड; एफडीएची धडक कारवाई, युवा सेनेचा विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आज मुंबई विद्यापीठातील कॅन्टीनला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. कॅन्टीनमधील अस्वच्छतेबद्दल ही कारवाई करण्यात आली. या कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनचालकाकडे वैध अन्न परवाना व नोंदणीही आढळली नाही.

विद्यापीठातील युवा सेनेच्या सदस्यांनी या कॅन्टीनबाबत अनेकदा तक्रारी करूनही विद्यापीठ प्रशासनाने टाळाटाळ केली होती. इतकेच नव्हे तर युवासेनेच्या सिनेट सदस्यांना अपात्रतेची नोटीसही बजावली होती. विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वच्छ व सुरक्षित अन्न उपलब्ध मिळावे याकरिता युवासेना सातत्याने विद्यापीठ प्रशासनाला तक्रार करीत होती. कित्येक वेळा फोर्ट कॅम्पस, कलिना कॅम्पस, मादाम कामा मुलींचे वसतीगृह, जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट येथील कॅन्टीनचे पह्टोदेखील दाखवून दिले, परंतु विद्यापीठ प्रशासन ढिम्म होते.

विद्यापीठ प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन युवा सेनेने तक्रार केली. फोर्ट कॅम्पसमधील कॅन्टीन चालवण्यास दिलेल्या व्यक्तीकडे आवश्यक परवानादेखील नाही. त्यामुळे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी अथवा एखाद्या राजकीय व्यक्तीच्या दबावामुळे काम देण्यात आले होते का? असा सवाल युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे.

विद्यापीठातील उपाहारगृहे, विद्यापीठाशी जोडलेल्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधील दुरवस्था, कलिना परिसरातील उपाहारगृहांची स्थिती याबाबत आपण प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कुलगुरू, कुलसचिव यांनी काहीच दखल घेतली नाही. उलट विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडल्यावर आपल्यालाच ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली. आता विद्यापीठ प्रशासन एफडीएलाही कारणे दाखवा नोटीस बजावणार का? – प्रदीप सावंत, सिनेट सदस्य

Comments are closed.