महिला खासदारांची सोन्याची साखळी वाढविली
दिल्लीत मॉर्निंग वॉकवेळी चोरट्याचा हिसका : केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. संसद भवनापासून काही अंतरावर असलेल्या तामिळनाडू भवनाजवळ सोमवारी सकाळी 6 वाजता ही घटना घडली. खासदार सुधा रामकृष्णन ह्या द्रमुक खासदार राजथी यांच्यासोबत फिरायला जात असताना एका स्कूटीवरून आलेल्या चोरट्याने हा गुन्हा केला.
गळ्यातील चेन हिसकावल्यामुळे खासदार सुधा रामकृष्णन यांच्या मानेला दुखापत झाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा तपास सुरू केला आहे. सुधा रामकृष्णन यांनी या घटनेसंबंधी पत्र लिहून पोलीस, लोकसभा सभापती आणि गृह मंत्रालयाला तक्रार केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात ‘आपल्या गळ्यातील सुमारे 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावली असून या गुन्हेगारी घटनेचा मला खूप धक्का बसला आहे’, असे त्यांनी कळवले आहे.
सुधा रामकृष्णन या तामिळनाडूतील मयिलादुथुराई येथील काँग्रेस खासदार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी त्या सध्या दिल्लीत आहेत. चाणक्यपुरीमध्ये ज्या ठिकाणी त्यांची साखळी हिसकावण्यात आली तो परिसर दिल्लीतील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानला जातो. येथे अनेक दूतावास आणि राज्य सरकारांचे अधिकृत निवासस्थान (भवन) आहेत.
चेहरा झाकून स्कूटीवरून चोरटा दाखल
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत काँग्रेस खासदार सुधा रामकृष्णन यांनी घटनेविषयीची माहिती दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी 6.15 ते 6.20 दरम्यान घडली. याप्रसंगी खासदार सुधा चाणक्यपुरी येथील पोलिश दूतावासाच्या गेट-3 आणि गेट-4 जवळ द्रमुक खासदार राजठी यांच्यासोबत मॉर्निंग वॉक करत होत्या. याचयादरम्यान समोरून स्कूटीवर बसलेला एक व्यक्ती हळूहळू खासदार सुधा रामकृष्णन यांच्याकडे आला. आरोपीने हेल्मेट घातले होते आणि त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. तो सुधा यांच्याजवळ पोहोचला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळून गेला. सोनसाखळी हिसकावल्यामुळे सुधा यांच्या गळ्याला दुखापत झाली. यानंतर काही वेळातच सुधा यांना दिल्ली पोलिसांचे एक गस्ती वाहन दिसल्यावर दोघांनीही त्यांच्याकडे तक्रार केली.
दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत : खासदार सुधा
काँग्रेस खासदार सुधा यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. ‘चाणक्यपुरीसारख्या अनेक दूतावास आणि संरक्षित संस्था असलेल्या उच्च सुरक्षा क्षेत्रात महिला खासदारावर अशा प्रकारचा हल्ला होणे खूपच धक्कादायक आहे. जर दिल्लीच्या या उच्च सुरक्षा क्षेत्रात महिला सुरक्षितपणे फिरू शकत नसतील तर आपण कुठे सुरक्षित राहू शकतो.’ अशी विचारणा त्यांनी केली.
Comments are closed.