बांगलादेश उच्चायुक्तालयात उग्र निदर्शने.

हिंदू युवकाच्या हत्येचा निषेध, हिंदू संघटना एकत्र

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगलादेशच्या उच्चायोग निवासाच्या बाहेर हिंदू संघटनांनी उग्र निदर्शने करत त्या देशात झालेल्या हिंदू युवकाच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी एकत्र येऊन या निदर्शनाचे आयोजन केले होते. या संघटनांचे सहस्रावधी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. केंद्र सरकारने उच्चायोग निवासाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.

मंगळवारी ही निदर्शने करण्यात आली. सकाळपासूनच असंख्य कार्यकर्ते या निदर्शनांसाठी जमा झाले होते. दिल्ल्लीतील दुर्गाबाई देशमुख मेट्रो स्थानकानजीक कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा जमाव जमला होता. या स्थानकाच्या नजीकच बांगलादेशचा उच्चायोग निवास आहे. निदर्शकांना तेथपर्यंत पोहचता येऊ नये, म्हणून संपूर्ण उच्चायोग निवासाभोवती लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. तथापि, आंदोलकांनी ही बॅरिकेडस् तोडून उच्चायोग निवासापर्यंत मुसंडी मारल्याचे दिसून आले. तथापि, कोणताही अवांछनीय प्रसंग घडला नाही. बॅरिकेडस्ची तीन आवरणे उच्चायोग निवासाच्या भोवती रचण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली.

प्रचंड घोषणा युद्ध

हजारोंच्या संख्येने जमलेल्या निदर्शकांनी बांगलादेशातील युनूस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘युनूस सरकार होश मे आओ’, ‘बांगलादेश सरकार मुर्दाबाद’, आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांची सुरक्षा होणे आवश्यक आहे. भारत सरकारनेही तेथील परिस्थिती गांभीर्याने घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

जमाव नियंत्रणाबाहेर

निदर्शने होत असताना काही वेळ जमाव नियंत्रणाबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. तथापि, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मागे सरकून मूळ स्थानी जाण्याचे आवाहन वारंवार केले. त्याचा योग्य तो परिणाम होऊन जमाव मागे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनीही स्थिती अत्यंत संयमाने हाताळली. परिणामी, कोणताही गंभीर प्रकार न घडता ही निदर्शने पार पडल्याचे दिसून आले.

दिपू दास यांच्या हत्येमुळे संताप

बांगलादेशात मेमनसिंग या स्थानी गेल्या आठवड्यात दिपू दास नामक हिंदू युवक कार्यकर्त्याची निर्घृण जमावहत्या करण्यात आली होती. ही हत्या तेथील इस्लामी कट्टरवाद्यांच्या जमावाने केली होती. दिपू दास याला तो काम करत असलेल्या कारखान्याबाहेर ओढून त्याला ठेचून मारण्यात आले होते. तो अर्धवट जिवंत असतानाच त्याला झाडाला लटकवून त्याला जाळण्यात आले होते. त्याने इस्लामची निंदा केल्याचा तथ्यहीन आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या हत्येमुळे भारतातही बांगलादेशच्या प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या संतापाचे दर्शन बांगलादेश उच्चायोगावरील प्रचंड निदर्शनांमुळे झाले आहे.

कोलकात्यातही निदर्शने

पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकाता येथेही हिंदू संघटनांनी उग्र निदर्शने केली. दिल्लीतील निदर्शने झाल्यानंतर कोलकाता येथेही स्थानिक नागरिकांनी बांगलादेशच्या उपउच्चायोग कार्यालयासमोर प्रचंड संख्येने जमून त्या देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध केला. बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही येथील अल्पसंख्य समुदायांच्या संरक्षणासाठी बांगलादेश प्रशासनावर दबाव आणला पाहिजे, अशी मागणी निदर्शकांकडून करण्यात आली. बांगलादेश सरकारवर सध्या आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने त्या प्रशासनाने दिपू दास याच्या हत्या प्रकरणात 10 जणांना अटक केली आहे. भारत सरकारनेही बांगलादेशला इशारा दिला आहे.

Comments are closed.