FIFA World Cup 2026: अर्जेंटिना पुन्हा विश्वविजेता बनणार! नायजेरियाशी आहे एक खास कनेक्शन, वाचा सविस्तर

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा येत्या १२ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये तीन वेळेचा चॅम्पियन अर्जेंटिना आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल. मागील आवृत्तीत (२०२२) अंतिम सामन्यात फ्रान्सला पराभूत (४-२) करत अर्जेंटिना तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला होता. यंदा एक असा अनोखा योगायोग समोर येत आहे, ज्यामुळे अर्जेंटिनाच्या चाहत्यांना त्यांचा संघ पुन्हा एकदा विश्वविजेता बनेल अशी आशा आहे. याचा संबंध नायजेरियाशी आहे.

फुटबॉलचे जग विचित्र योगायोग आणि मनोरंजक आकडेवारीने भरलेले आहे. असाच एक भन्नाट योगायोग नायजेरिया आणि अर्जेंटिनाच्या बाबतीत आहे. नायजेरिया जेव्हा जेव्हा विश्वचषकासाठी अपात्र ठरला तेव्हा तेव्हा अर्जेंटिना विश्वविजेता ठरला आहे. आश्चर्य वाटले ना, मात्र हे खरे आहे.

असे पहिल्यांदा ११९७८ मध्ये घडले, त्या स्पर्धेत नायजेरिया पात्र ठरू शकला नाही आणि अर्जेंटिनाने उत्कृष्ट कामगिरी करत त्या हंगामात आपले पहिले-वहिले विश्वविजेतेपद पटकावले. १९८६ च्या विश्वचषकातही त्याची पुनरावृत्ती झाली. नायजेरिया स्पर्धेतून बाहेर पडला आणि दिएगो मॅराडोनाच्या जादूमुळे अर्जेंटिनाने दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली. २०२२ च्या आवृत्तीतही नायजेरिया स्पर्धेत स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आणि लियोनल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने ३६ वर्षांचा दुष्काळ संपवून तिसऱ्यांदा विजेता चषक उंचावला.

आता २०२६ मध्येही नायजेरिया फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे अर्जेंटिनाच्या चाहत्यांना आशा आहे की संघ चौथ्यांदा विजेता बनेल. या स्पर्धेत अर्जेंटिना गट जे मध्ये असून त्यांचा पहिला सामना १७ जून रोजी अल्जेरियाविरुद्ध आहे. या गटात ऑस्ट्रिया आणि जॉर्डन देखील आहेत. या स्पर्धेसाठी गतविजेत्याच्या संघात २०२२ च्या १७ खेळाडूंचा समावेश आहे.

फिफा विश्वचषक २०२६ साठी अर्जेंटिनाचा संघ
गोलरक्षक
– एमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुल्ली, जुआन मुसो.
बचावकर्ते – गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस ओटामेंडी, लिओनार्डो बालेर्डी, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस टॅगलियाफिको, फॅकुंडो मेडिना.
मिडफिल्डर – जिओवानी लो सेल्सो, लिएंड्रो परेडिस, रॉड्रिगो डी पॉल, एक्क्विएल पॅलासिओस, एन्झो फर्नांडीझ, ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर, व्हॅलेंटीन बारको.
फॉरवर्ड – लिओनेल मेस्सी, निकोलस गोन्झालेझ, ज्युलियानो सिमोन, लॉटारो मार्टिनेझ, जोस मॅन्युएल लोपेझ, ज्युलियन अल्वारेझ, थियागो अल्माडा आणि निको पाझ.

Comments are closed.