FIFA World Cup 2026 – कॅनडापुढे बोस्नियाचे आव्हान
सहयजमान कॅनडा सलग दुसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळत असून, शुक्रवारी ग्रुप ‘बी’मधील सलामीच्या सामन्यात त्यांच्यासमोर बोस्निया आणि हर्झेगोविनाचे आव्हान असणार आहे. कॅनडा आणि बोस्निया यांच्यातील हा पहिलाच अधिकृत सामना असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ गेल्या आठ सामन्यांपासून अपराजित आहेत. त्यामुळे टोरोंटोच्या बीएमओ फिल्डवर रंगणाऱया या लढतीकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
घरच्या मैदानाचा फायदा घेत यंदा गटसाखळीची अडथळा शर्यत पार करण्याचा कॅनडाचा निर्धार आहे. ग्रुप ‘बी’मध्ये बोस्निया, स्वित्झर्लंड आणि कतार या संघांचा समावेश असल्याने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. युरोपीय पात्रता फेरीतील प्ले-ऑफमध्ये बलाढय़ इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 असे धक्कादायक पराभूत करून बोस्नियाने वर्ल्ड कपचे तिकीट मिळवले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. कॅनडावर मात्र मोठा दबाव आहे. बोस्नियाचा हा केवळ दुसरा विश्वचषक असून 2014 मध्ये त्यांनी प्रथम सहभाग नोंदवला होता. सध्या ते सलग आठ सामने अपराजित आहेत.
Comments are closed.