FIFA World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! ऑस्ट्रेलियाचा तुर्कीवर 2-0 ने धमाकेदार विजय

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये रविवारी (१४ जून) एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. व्हॅंकुव्हरच्या बीसी प्लेस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप डी च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तुर्कीवर २-० असा विजय मिळवून सर्वांना चकित केले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच ऑस्ट्रेलिया आत्मविश्वासपूर्ण दिसत होता. त्यांनी तुर्कीवर दबाव कायम ठेवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची सुरूवात उत्तम झाली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. २० वर्षीय नेस्टोरी इर्नकुंडाने २७ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याला पॉल ओकोन-एंगस्टलरकडून एक चांगला पास मिळाला. त्याने त्याचे रुपांतर गोलमध्ये केले. तसेच या गोलमुळे तो ऑस्ट्रेलियासाठी या स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियाचा गोलकीपर पॅट्रीक बीचने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण उत्कृष्ठ आणि लक्षात राहण्याजोगे केले. पहिल्या हाफमध्ये तुर्कीने बरोबरी साधण्याचे प्रयत्न केले, मात्र बीचने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही त्याच्या अप्रतिम बचावांमुळे तुर्कीला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी कायम ठेवली.

दुसऱ्या हाफमध्येही ऑस्ट्रेलियाचा दबाव दिसला. त्यांनी आक्रमक खेळ करत चेंडूंवर आपले नियंत्रण ठेवले आणि आघाडी वाढवण्याचे प्रयत्न केले. ५३ व्या मिनिटाला हॅरी साउटरने कॉर्नर किकवर हेडर मारण्याचा प्रयत्न केले, मात्र तुर्कीचा गोलकीपर उगुरकान चाकीरने उत्कृष्ट बचाव केला. काही मिनिटांनंतर तुर्कीला बरोबरी साधण्याची संधी मिळाली, मात्र अर्दा गुलरचा शॉट बीचने अप्रतिमरित्या वाचवला. ७५ व्या मिनिटाला कॉनर मेटकाफने ऑस्ट्रेलियासाठी दुसरा गोल करून सामना जवळपास निश्चित केला होता. आघाडी वाढल्याने तुर्कीवर आणखी दबाव आला. तसेच ऑस्ट्रेलियाने बचाव कायम राखत शेवटपर्यंत तुर्कीला गोल करण्याची संधी दिलीच नाही.

ऑस्ट्रेलियासाठी हा विजय विशेष राहिला. २००६ नंतर प्रथमच त्यांनी फिफा विश्वचषकात आपला सलामीचा सामना जिंकला. तुर्कीला पुढील सामन्यांमध्ये पुनरागमन करण्यासाठी आपला खेळ सुधारावा लागणार आहे.

Comments are closed.