FIFA WC26: मेस्सीचा वर्ल्डरेकॉर्ड अन् अर्जेंटिनाचा एक्स्ट्रा टाईम धमाका; गतविजेते सेमीफायनलमध्ये

फिफा विश्वचषक २०२६ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने आटोपले असून अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. आज (१२ जुलै) झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने नॉर्वेचा २-१ तर कॅन्सस सिटी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा ३-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत (सेमीफायनल) प्रवेश केला आहे.

अर्जेंटिनाने राऊंड ऑफ १६ मध्ये इजिप्तचे आव्हान पार केल्यानंतर पुन्हा एकदा झुंजार कामगिरी केली आहे. त्यामुळे विजेतेपद कायम राखण्यापासून आता अर्जेंटिना केवळ दोन विजयांच्या अंतरावर आहे. असा पराक्रम शेवटचा १९६२ मध्ये ब्राझीलने केला होता.

पहिला हाफ
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने चांगली सुरूवात केली. त्यांनी १० व्या मिनिटालाच १-० अशी आघाडी घेतली. लिओनेल मेस्सीच्या आकर्षक कॉर्नरवर ऍलेक्सिस मॅक ऍलिस्टरने गोल केला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने आघाडी कायम ठेवली. त्याचबरोबर स्टार फुटबॉलपटूने एक विश्वविक्रम आपल्या नावे केली.

मेस्सीचा वर्ल्डरेकॉर्ड
मेस्सी फिफा विश्वचषकात सर्वाधिक १० असिस्टची नोंद करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. या यादीत दुसऱ्या स्थानावर अर्जेंटिनाचाच महान खेळाडू दिएगो मॅराडोना (८ असिस्ट) आहे. तसेच जर्मनीचा पियरे लिटरबारस्की आणि पोलंडचा ग्रझेगोर्झ लाटो हे संयुक्तपणे तिसऱ्या स्ठानावर आहेत. दोघांनी प्रत्येकी विश्वचषकात ७-७ असिस्ट नोंदवल्या आहेत.

दुसऱ्या हाफमध्ये सामना बरोबरीत अन् रेड कार्ड
दुसऱ्या हाफमध्ये स्वित्झर्लंडने आपला प्रयत्न सुरूच ठेवला. त्यांनी एकामागोमाग एक हल्ले करत अर्जेंटिनाच्या बचावफळीला अडचणीत आणले. लिसांद्रो मार्टिनेझने केलेल्या उत्तम बचावामुळे डॅन न्दोयेचा प्रयत्न अपयशी ठरला.

अखेर ६७ मिनिटाला स्वित्झर्लंडला यश आले आणि त्यांनी सामना १-१ असा बरोबरीत केला. रिकार्डो रॉड्रिग्जच्या असिस्टवर न्दोयेने गोल केला. मात्र, अवघ्या ५ मिनिटांनंतर एम्बोलोला दुसरे यलो कार्ड मिळाले आणि स्वित्झर्लंडला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला.

पहिली ९० मिनिटे संपली असता सामना १-१ असा बरोबरीत राहिला. अतिरिक्त वेळेत पुन्हा एकदा अर्जेंटिनाने बाजी मारली. त्यांच्याकडून ज्युलियन अल्वारेझने (११२’) गोल करत अर्जेंटिनाची आघाडी २-१ अशी भक्कम केली. तसेच शेवटच्या क्षणात लाउटारो मार्टिनेझने (१२१’) गोल केला. त्यामुळे अर्जेंटिनाचा ३-१ असा विजय निश्चित झाला.

सेमीफायनलमध्ये इंग्लंडचे आव्हान
या विजयामुळे अर्जेंटिनाने आपल्या गेल्या चार स्पर्धांपैकी तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता त्यांचा पुढील सामना इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. १६ जुलैला खेळला जाणारा हा सामना अटलांटा स्टेडियमवर रंगणार आहे.

त्याआधी पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्स आणि स्पेन समोरा-समोर येणार आहेत. हा सामना १५ जुलैला खेळला जाणार आहे. (FIFA WC 2026: Lionel Messi world record Argentina beat Switzerland in extra time and defending champions reach semi-finals.)

Comments are closed.