FIFA World Cup 2026 – गड गेला आणि सिंहही… नेमारचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा, अखेरचा गोल लगावत घेतला निरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्राझीलसारख्या दिग्गज संघाचा अखेर घात झाला. नॉर्वेने त्यांना पराभूत केले. पण त्यानंतर ब्राझीलच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. कारण करोडो हृदयसिंहासनावर आरूढ असलेल्या नेमार ज्युनियरने अखेर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आणि त्याच्या चाहत्यांचे डोळे पाणावले. पेले, रोनाल्डो, रॉबिन्हो, काका या ब्राझीलच्या फुटबॉल परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या या ‘गोलकरी’ने अखेर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला.

नेमार निवृत्तीबाबत काय म्हणाला

सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना 34 वर्षीय नेमार भावूक झाला होता. आपल्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी तो म्हणाला की, मी खूप प्रयत्न केले, माझ्याकडून जे शक्य होते ते सर्व काही मी केले. पण आता हा प्रवास संपला आहे. मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेच्या याच भूमीवर केली आणि तिचा शेवटही इथेच करत आहे! या विधानामुळे ब्राझीलसाठी एका युगाचा अंत झाला आहे.

निरोपाच्या सामन्यात शेवटचा गोल केला

फिटनेसच्या समस्येमुळे नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात नेमार बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. स्टॉपेज टाईमच्या 10व्या मिनिटाला पॅसेमिरोवर झालेल्या फाऊलमुळे ब्राझीलला पेनल्टी मिळाली. तेव्हा नेमारने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. हा त्याचा स्पर्धेतील पहिला आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा गोल होता. दुखापत आणि फिटनेसच्या समस्यांमुळे या विश्वचषकासाठी नेमारच्या निवडीबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत शंका होती. परंतु मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून संघात त्याचा समावेश केला. पण अँसेलोटींच्या आशा त्याच्याकडून पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

Comments are closed.