Fifa World Cup वादाचा पहिला गोल! इराणी चाहत्यांना तिकिटे नाकारल्याचा आरोप; महासंघाचा संताप, ट्रम्प यांच्यामुळे वाद चिघळला
फुटबॉलच्या महाकुंभाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच फिफा वर्ल्ड कप स्पर्धा वादाच्या भोवऱयात सापडली आहे. इराणच्या फुटबॉल महासंघाने गंभीर आरोप करत फिफाने अखेरच्या क्षणी इराणी फुटबॉलप्रेमींना सामन्यांची तिकिटे देण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीसाठी आधीच नियोजन केलेल्या हजारो चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराण फुटबॉल महासंघाने (एफएफआरआय) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक इराणी समर्थकांनी फिफाने जाहीर केलेल्या अधिकृत प्रक्रियेनुसार तिकिटांसाठी अर्ज करून प्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली होती, मात्र अखेरच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक चाहत्यांना स्टेडियमबाहेरच राहावे लागू शकते.
दरम्यान, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या वर्ल्ड कपपूर्वी इराणशी संबंधित वादांची मालिका वाढतच आहे. इराणच्या सहभागाबाबत गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेचे वातावरण होते. त्यातच व्हिसा वाद आणि तेहरान-वॉशिंग्टनमधील राजकीय तणावामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
फिफाच्या नियमानुसार, विश्वचषकात सहभागी होणाऱया प्रत्येक 48 संघांच्या महासंघाला स्टेडियम क्षमतेनुसार किमान आठ टक्के तिकिटांचा कोटा देणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत इराणी चाहत्यांना तिकिटे नाकारल्याचा आरोप अधिकच गंभीर मानला जात आहे. इराणचा पहिला सामना 15 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
फुटबॉलपेक्षा वादांचीच अधिक चर्चा
12 जूनपासून सुरू होणारा फिफा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे. या स्पर्धेत तब्बल 48 संघ सहभागी होणार असून 104 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, स्पर्धेच्या प्रारंभापूर्वी खेळाडूंची अटक, पंचांची पुनर्नियुक्ती, व्हिसा वाद, तिकिटांच्या वाढलेल्या किमती आणि चाहत्यांच्या तक्रारी यामुळे फिफा तसेच यजमान देशांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जगभरातील कोटय़वधी फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा हा महाउत्सव नियोजित वेळेत सुरू होणार असला तरी पहिल्याच शिट्टीपूर्वी वादांची मालिका सुरू झाल्याने विश्वचषकाच्या झगमगाटावर काहीसे सावट पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळेही रंगला वाद
अमेरिका आणि इराणमधील राजकीय संघर्षाचा परिणाम फुटबॉलवरही दिसून आला. स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या दहा दिवस आधी इराणी खेळाडूंना व्हिसा मंजूर करण्यात आला, तर इराणी शिष्टमंडळातील अनेक प्रशासकीय अधिकाऱयांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणचे राजदूत अली पसंदीदेह यांच्या म्हणण्यानुसार, 70 सदस्यीय शिष्टमंडळातील 15 जणांना अमेरिकेत प्रवेशाची परवानगी मिळाली नाही. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मार्च महिन्यात इराणी संघाच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे विश्वचषकात स्वागत आहे, मात्र त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमेरिकेत त्यांची उपस्थिती योग्य ठरेल असे मला वाटत नाही,’ असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
Comments are closed.