राज्यात 50 हजार शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रस्तावच नाही

आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक राहिले असताना राज्यातील अंशतः व विनाअनुदानित तीन हजार शाळा, 15 हजार तुकड्यांना वाढीव 20 टक्क्यांचे टप्पा अनुदान मिळाले नसल्याने तब्बल 50 हजारांवर शिक्षकांची पगारवाढ रखडली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शिक्षण खात्याकडून निधीसाठी प्रस्तावच पाठवला नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

राज्यातील 771 शाळा व 383 तुकड्या गेल्या 11 वर्षांपासून 20 टक्के अनुदानावर सुरू आहेत. त्यांना मागच्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळाले. यानंतर याच अंशतः व विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना अद्याप वाढीव टप्पा मिळालेला नाही. त्या शाळा व तुकड्यांना 430 कोटींचा निधी अपेक्षित आहे. त्यानंतर 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आलेल्या 228 शाळा व 2650 तुकड्यांना पुढचा वाढीव टप्पा (दरवर्षी 250 कोटी) यंदा मिळालेला नाही. तसेच या वर्षी राज्यातील दोन हजार नऊ शाळा व चार हजार 11 तुकड्यांचे टप्पा अनुदान 80 टक्के व्हायला हवे होते, पण त्यासाठी 376 कोटींचा निधी न मिळाल्याने त्या शाळा व तुकड्या अजूनही 60 टक्क्यांवरच आहेत.

वाढीव टप्पा अनुदानाची स्थिती

  • वाढीव अनुदानास पात्र शाळा – 3,427
  • अनुदानाच्या प्रतीक्षेत तुकड्या – 15,571
  • पगारवाढीतील अंदाजे शिक्षक – 51,000
  • अनुदानासाठी अपेक्षित निधी – 1100 कोटी

Comments are closed.