ईव्हीएमच्या सुरक्षेवरून राजकारण तापले; परळीत स्ट्राँग रूमबाहेर राडा, जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

नगरपालिका, नगरपरिषदेचे निकाल लांबल्याने ईव्हीएमच्या सुरक्षेवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्री बीड जिल्ह्यातील परळी येथील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमबाहेर जोरदार राडा झाला. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांची निवडणूक विभागाचे अधिकारी अरविंद लाठकर यांच्याशी शाब्दीक चकमक झाली. यामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे नगरपरिषदेसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परळी नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख हे बुधवारी रात्री 11 वाजता नगर परिषदेत स्ट्राँगची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून त्यांचा उपस्थित निवडणूक विभागाच्या कर्मचाऱयांशी वाद झाला. याची माहीती मिळताच देशमुख समर्थक नगरपरिषदेसमोर मोठय़ा संख्येने जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्ट्राँग रूमला वेढा घालणाऱया देशमुख समर्थक जमावाला पांगवण्यासाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवून सौम्य लाठीमार करण्यात आला. सध्या परिस्थिती तणावपूर्ण पण शांततेत आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
वाद कशावरून
नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाची निवडणूक लढवलेल्या 159 उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना स्ट्राँग बाहेर बसण्यासाठी 80 मिनिटांचा वेळ देण्यात येईल, असे निवडणूक अधिकारी लाठकर यांनी जाहीर केले.
माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यानी मतदान यंत्रामध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे, असा संशय व्यक्त करून आम्हाला 24 तास येथे निगराणीसाठी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
येथे सीसीटिव्हीही असल्याचे लाठकर यांनी सांगितले. परंतु देशमुख व त्यांचे समर्थकांना त्यांचे म्हणणे मान्य नव्हते. त्यांनी स्ट्राँग रूम परिसरात लावलेले सीसीटिव्हीचे प्रक्षेपण सार्वजनिक करण्याची मागणी करत गोंधळ घातला.
गोंदियात ईव्हीएमध्ये छेडछाड; तहसीलदारांना हटवले
गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत सर्व पक्षीय उमेदवारांनी तहसील कार्यालयाला घेरावा घातला. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मोनिका कांबळे यांना हटवून त्यांच्या जागी अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची नियुक्ती केली आहे.

Comments are closed.