हिंदुस्थानी हॉकी संघाचा सलग सहावा पराभव

एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये हिंदुस्थानी संघासाठी रविवारीचा दिवस निराशाजनक ठरला. अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंगने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 400 वा सामना खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला, मात्र संघाला ऑस्ट्रेलियाकडून 2-3 ने पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानचा लीगमधील हा सलग सहावा पराभव ठरला.

ऑस्ट्रेलियाकडून टीम ब्रँड (चौथ्या मिनिटाला), ब्लेक गोव्हर्स (5व्या मिनिटाला) आणि कूपर बर्न्स (18व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला. हिंदुस्थानसाठी संजयने तिसऱ्या मिनिटाला, तर दिलप्रीतने 36व्या मिनिटाला गोल केला. सामना सुरू होताच हिंदुस्थानने संजयच्या गोलमुळे आघाडी घेतली. परंतु लगेचच टीम ब्रँडने गोल करत हिंदुस्थानचा आनंद अल्पायुषी ठरविला. काही सेपंदांतच गोव्हर्सने दुसरा गोल करत ऑस्ट्रेलियाला 2-1 असे आघाडीवर नेले.

मनप्रीतच्या ऐतिहासिक सामन्याला पराभवाची धार

या सामन्यातून मनप्रीत सिंगने हिंदुस्थानी हॉकीच्या इतिहासात चारशेवा सामना खेळून आणखी एक मानाचा ठसा उमटवला आहे. 33 वर्षीय पंजाबच्या या खेळाडूने माजी कर्णधार आणि हॉकी इंडिया अध्यक्ष दिलीप टिकाa (412 सामने) यांच्यानंतर सर्वाधिक सामने खेळण्याचा मान मिळवला आहे. मात्र मनप्रीतच्या या ऐतिहासिक सामन्याला विजयाचा टिळा लागू शकला नाही.

Comments are closed.