मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा; रोहित पवार यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर येथील एका केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील तीन मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलीस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलीस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलीस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली. संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याशीही रोहित पवार यांनी चर्चा केली.

याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता?
छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पिडीत युवती कोण?
या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन केले?
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का?
कोथरूडला तीन युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेले, यासाठी पोलिसांकडे तसा सर्च वारंट होता का?
चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या? पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? कुणाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
या तीन युवतीना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली?

एकूणच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्यावरून पोलिसांवर असलेला राजकीय दबाव स्पष्ट दिसत असून पोलीस यंत्रणा केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, असा समज पसरत आहे. परिणामी पोलीस यंत्रणेविषयीच जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील.

सत्तेची मस्ती चढल्याने निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांच्या दबावात येऊन काम करणाऱ्या सरकारी यंत्रणाही निर्ढावतात. अशा यंत्रणांचा सर्वाधिक फटका हा सर्वसामन्यांना आणि दीन-दुबळ्यांना बसतो. तसाच काहीसा प्रकार तीन युवतींच्या बाबतीत घडला. त्यांना चक्क कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.

याबाबत गुन्हा दाखल व्हावा म्हणून दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत होते. काल रात्री मी स्वतः तसेच अंजलीताई आंबेडकर, प्रशांतदादा जगताप, सुजात आंबेडकर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, वंचित, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रात्री ३ वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसलो, पण यंत्रणा मात्र तक्रार घ्यायला तयार नव्हत्या. पोलिसांनी तक्रार घेतली नसली तरी जनमताच्या दबावापुढे झुकत पोलिसांकडून तसं लेखी मात्र आम्ही घेतलं. पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांना अशाच प्रकारे त्रास देणार असेल तर आम्हीही #आवाज_खाली असाच प्रतिसाद देऊ. झोपलेले गृहमंत्री जागे होतील, ही अपेक्षा! असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.