MPL 2025: साखळी फेरीचा अखेरचा दिवस ठरणार रोमांचक, प्ले ऑफ्सच्या एका जागेसाठी तिघांत रस्सीखेच
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये गुरुवारी (19 जून) तीन सामने होणार आहेत. साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या या तीन सामन्यांमधून, स्पर्धेतील अखेरचा प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करणारा संघ मिळेल. यापूर्वी तीन संघांनी प्ले ऑफ्समधील आपले स्थान निश्चित केले आहे.
गुरुवारी पहिला सामना रायगड रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स असा खेळला जाईल. सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाला विजय अनिवार्य आहे. त्यांनी या सामन्यात विजय मिळवल्यास ते प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरलेला अखेरचा संघ बनतील. तसेच, पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास त्यांना एक गुण मिळून 9 गुणांसह प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करतील. मात्र, पराभव झाल्यास उर्वरित दोन सामन्यांकडे त्यांचे लक्ष असेल. दुसरीकडे रायगड रॉयल्स यापूर्वीच प्ले ऑफ्समध्ये दाखल झाले असून, विजय मिळवून दुसऱ्या स्थानावर साखळी फेरी समाप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा आणि सातारा वॉरियर्स समोरासमोर येणार आहेत. हा सामना सातारा वॉरियर्स संघासाठी निर्णायक असेल. दिवसातील पहिल्या सामन्यात कोल्हापूर संघाचा पराभव झाल्यास, सातारा संघाकडे विजय मिळवून प्ले ऑफ्स खेळण्याची संधी असेल. मात्र, विजयानंतर देखील त्यांना दिवसातील अखेरच्या सामन्यावर लक्ष ठेवावे लागेल. हा सामना पावसाने रद्द झाल्यास अथवा सातारा संघाचा पराभव झाल्यास, ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पुणेरी बाप्पा संघाने हा सामना जिंकल्यास त्यांचे दुसरे स्थान निश्चित होईल. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.
साखळी फेरीतील अंतिम सामना अव्वल स्थानावरील ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध गतविजेते रत्नागिरी जेट्स असा खेळला जाईल. कोल्हापूर व सातारा यांनी आपापले सामने गमावल्यास, रत्नागिरी जेट्स विजय मिळवून थेट प्ले ऑफ्समध्ये जागा बनवेल. तर, ईगल नाशिक टायटन्स या सामन्याकडे प्ले ऑफ्सच्या तयारीच्या दृष्टीने पाहिल. त्यांचे अव्वल स्थान यापूर्वीच निश्चित झालेले आहे.
Comments are closed.