शहीद तेजस पायलटला अखेरचा सलाम
हिमाचल प्रदेशात शोकाकूल वातावरण : पूर्ण लष्करी सन्मानाने अंतिम निरोप
Vrtç संस्था/ नवी दिल्ली, कांगडा (हिमाचल प्रदेश)
दुबई एअर शोमध्ये अपघात झालेल्या तेजस लढाऊ विमानाचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांना रविवारी अंतिम निरोप देण्यात आला. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने हुतात्मा नमांश यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी विंग कमांडर अफशान यांनी त्यांच्या पार्थिवाला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचे अभिवादन केले. विंग कमांडर अफशान यांचा पती नमांश यांच्या अंत्यसंस्काराला अभिवादन करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अभिवादन केल्यानंतर लगेचच त्यांना अश्रू अनावर झाले. त्याक्षणी अफशान आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले होते.
नमांश स्याल यांचे कुटुंब मूळचे हिमाचल प्रदेशमधील असून संपूर्ण राज्यात गेल्या तीन दिवसांपासून शोकाकूल वातावरण होते. नमाश यांची पत्नी अफशान ही स्वत: देखील एक विंग कमांडर आहे. त्यांना 7 वर्षांची एक निष्पाप मुलगी आहे. नमांश यांचे वडील गगन कुमार हे स्वत: माजी शिक्षक आहेत.
दुबई एअर शोमध्ये तेजस अपघातात नमांश हुतात्मा झाले. त्यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय वायुसेनेचे तीव्र शोक व्यक्त केला आहे. एक समर्पित लढाऊ वैमानिक गमावल्याची भावना सदैव आमच्या स्मरणात राहील, असे ट्विट वायुदलाने केले आहे. या दु:खद प्रसंगी भारतीय वायुसेना त्यांच्या कुटुंबासोबत एकजुटीने उभी आहे. त्यांच्या धैर्य, समर्पण आणि सन्मानाच्या वारशाचा सन्मान करते. त्यांच्या सेवेचे कृतज्ञतेने स्मरण केले जाईल, असेही वायुदलाने म्हटले आहे.
Comments are closed.