बिहारमध्ये जाहीर केलेली अंतिम मतदार यादी

निवडणूक आयोगाकडून ‘एसआयआर’ची प्रक्रिया पूर्ण : आता लवकरच विधानसभा निवडणुकांची घोषणा शक्य

वृत्तसंस्था / पाटणा

निवडणूक आयोगाने मंगळवारी बिहारमध्ये विशेष गहन सुधारणाची (एसआयआर) अंतिम मतदारयादी जाहीर केली. प्राथमिक माहितीनुसार, या यादीत अंदाजे 7.42 कोटी मतदारांचा समावेश असून त्यापैकी अंदाजे 21.53 लाख नवीन मतदार आहेत. हे सर्व नवमतदार लोकशाहीच्या लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावतील. 69.29 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेला हा डेटा थेट निवडणूक धोरणांवर परिणाम करेल. तसेच राजकीय पक्षांसाठी नवीन आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण करेल असे बोलले जात आहे. या सुधारित यादीनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याचे संकेतही मिळत आहेत.

निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी जाहीर केल्यानंतर आता 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी चालू आठवड्यात राज्याचा दौरा करून सविस्तर आढावा घेतल्यानंतर पुढील आठवड्यात निवडणूक तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्याची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम मतदारयादी प्रकाशित करण्यात आली आहे. कोणताही मतदार आता प्ttज्s://न्दे.ाम्ग्.gदन्.ग्ह/ या अधिकृत पोर्टलला भेट देऊन त्यांचे नाव आणि तपशील पाहू शकतो. मतदारयादीत नावनोंदणीमुळे मतदानाचा अधिकार सुनिश्चित होत असल्याने आयोगाने सर्व पात्र नागरिकांना त्यांच्या नोंदी पडताळण्याचे आवाहन केले आहे.

‘एसआयआर’ प्रक्रियेअंतर्गत नवीन मतदारांची नावे जोडण्यात आली असून मृत आणि डुप्लिकेट नोंदी काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांचे पत्ते अपडेट करण्यात आले आहेत. यावेळी, मतदारांना पारदर्शक आणि अचूक यादी देण्यासाठी आयोगाने तांत्रिक साधनांच्या वापरावर विशेष भर दिला आहे. या अंतिम यादीच्या प्रसिद्धीनंतर सर्व पक्ष आता त्यांच्या संबंधित मतपेढ्यांना एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करतील. नवीन तरुण मतदार निवडणूक आडाखे बदलू शकतात, तर वृद्ध मतदारांचा कल देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ही यादी केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही तर बिहारच्या निवडणूक भविष्याची दिशा देखील निश्चित करेल.

 

Comments are closed.