मीरा-भाईंदर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जैसे थे; 24 वॉर्डातून 95 नगरसेवक निवडून येणार, 6 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणकीसाठीचा अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. २०१७ मधील जुनीच प्रभाग रचना जैसे थे ठेवत निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. जाहीर प्रभार रचनेनुसार मीरा-भाईंदरमध्ये २४ वॉर्डमधून ९५ नगरसेवक निवडून येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पालिका कार्यक्षेत्रातील हद्दीचा नकाशा आणि सिमांकन निश्चित केलेली प्रभाग रचनेची प्रत मुख्यालयात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ५१ हरकती व सूचना आल्या होत्या. या सर्व हरकती निकाली काढल्या असून २०१७ साली कायम केलेल्या प्रभाग रचनेला आता महापालिका व निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. प्रभाग रचनेचे तपशील प्रभाग कार्यालयासह पालिका मुख्यालयात ठेवण्यात आले आहेत. प्रसिद्ध झालेली अंतिम प्रभाग रचना जुन्या प्रभागाप्रमाणेच असून त्यात काहीही बदल झालेले नाहीत. आरक्षण दिवाळीनंतर जाहीर होणार आहे. या आरक्षण सोडतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चार सदस्यांचा एक वॉर्ड
राज्य सरकारच्या जुन्या निर्णयानुसार चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरात १ ते २३ वॉर्डमधून ४ नगरसेवक असतील तर २४ व्या वॉर्डमधून ३ नगरसेवक निवडून येतील.
२७ ते ३८ हजार मतदार
प्रत्येक वॉर्डमध्ये कमीत कमी २७हजार ३०५ ते जास्तीत जास्त ३८ हजार ४३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग १० मध्ये सर्वाधिक मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार प्रभाग २ मध्ये आहेत.
Comments are closed.