अखेर खालसा महाविद्यालयात थिएटर कमिटी स्थापन होणार, युवासेनेच्या मागणीला यश

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माटुंग्याच्या गुरुनानक खालसा महाविद्यालयात तातडीने थिएटर कमिटी स्थापन करावी तसेच विद्यार्थ्यांना सरावाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली होती. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता थिएटर कमिटी स्थापन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवासेनेचे आभार मानले आहेत.
खालसा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात येते. या कमिटीच्या अंतर्गत नाटय़श्रय ग्रुपने मराठी एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत मागील तीन वर्षात खालसा महाविद्यालयास अटल करंडक, उंबरठा, लोकांकिका, बोलीभाषा, ईप्ता, स्पंदन, मंथन, आयएनटी आदी स्पर्धांमधून अनेक पारितोषिक मिळवून दिली, परंतु या वर्षी थिएटर कमिटी अजूनपर्यंत स्थापन न केल्यामुळे अनेक नाटय़स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होता आले नाही. शिवाय नियमित सरावाच्या जागी प्रयोगशाळा सुरू केल्यामुळे पर्यायी जागासुद्धा देण्यात आली नाही.
विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा
यासंदर्भात विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्यांनी खालसा महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ. जसप्रीत कौर, डॉ. किरण माणगावकर, प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा यांची भेट घेऊन तातडीने थिएटर कमिटीची स्थापना करावी तसेच विद्यार्थ्यांना सरावासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर विश्वस्त आणि प्राचार्या यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, युवासेना पदाधिकारी नीलेश बडदे, रितेश सावंत आणि स्वप्नील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Comments are closed.