अखेर राजीनामा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पदत्याग

सीजेपी’च्या आंदोलनाला मोठे यश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

दिल्लीसह देशभरात पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी अखेर राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी दोन पानी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींना आपला राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. त्यानंतर ‘सीजेपी’च्या दोन प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा करत पुन्हा एकदा आपल्या मागण्यांबाबत सखोल चर्चा केली. केंद्रीय मंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती संयुक्त पत्रकार परिषद घेत जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा ‘सीजेपी’ने केली.

गेल्या 10 दिवसांतील घटनांमुळे आपण व्यथित झालो आहे. हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. मी देशाच्या युवाशक्तीला दुष्टचक्रात अडकू देणार नाही. हा माझा निर्धार आहे, अशा भावना मांडत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला. प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात एक पत्र पोस्ट केले आहे. या दोन पानांच्या आणि 575 शब्दांच्या पत्रात, प्रधान यांनी इतर गोष्टींबरोबरच दोन ठिकाणी तरुणांची दिशाभूल केल्याचा उल्लेखही केला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ गेल्या 36 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होती. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ‘सीजेपी’चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी जंतरमंतरवर आनंद व्यक्त करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. “या सरकारमध्ये राजीनामे दिले जात नाहीत; अशी काहींची भावना होती. पण, ‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए’, असे वक्तव्य केले आहे.

अभिजित दीपके यांच्या भावना

जंतरमंतरवर अभिजीत दीपके म्हणाले, मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या अन्य मागण्याही मान्य व्हायला हव्यात. एकदा झुरळ आत शिरले की ते बाहेर जात नाही. आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ते ‘सीजेपी’शी पंगा घेत होते. आम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला, तर तुम्ही काय आहात? विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेतले पाहिजेत. भाऊ, ही लोकशाही आहे. महिनाभर लोक मला विचारत आहेत, ‘तुम्ही काय करत आहात? अजून किती काळ इथे बसणार आहात? ते राजीनामा देणार नाहीत. हे एक मनमानी सरकार आहे, पण आम्ही हे करून दाखवले’ असे दीपके यांनी जंतरमंतरवर परखड भाष्य केले.

12 वर्षांतील पहिला राजीनामा

2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासूनच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात आंदोलनांमुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान हे पहिले मंत्री आहेत. तथापि, परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी यापूर्वी 2018 मध्ये राजीनामा दिला होता, परंतु त्यावेळी ‘मी टू’ आंदोलन जगभर पसरले होते. तसेच अकबर यांच्यावर त्यांच्या पत्रकारितेच्या काळात लैंगिक छळाचे आरोपही झाले होते. ‘मी टू’ चळवळ 2018 मध्ये सुरू झाली. त्यावेळी एम. जे. अकबर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री होते. या चळवळीदरम्यान अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्या पत्रकारितेच्या काळात झालेल्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप त्यांच्यावर केले. हा वाद वाढल्याने अकबर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सकाळी दिल्लीतील एका कार्यक्रमात महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ‘आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे वागू, सत्तेच्या जोरावर आम्ही सर्वांचे मालक बनू, हे होऊ शकत नाही.’ आजची नवीन पिढी खूप प्रश्न विचारते. आपण त्यांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी बोलले पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजावून सांगितला पाहिजे, आदेश देऊ नयेत. केवळ संवादातूनच आपण त्यांना योग्य दिशा दाखवू शकतो.’ असे ते म्हणाले होते. भागवत यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

…हा लोकशाहीचा विजय : सोनम वांगचुक

सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून एक पोस्ट करत ‘हा लोकशाहीचा, प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे… रस्त्यांवर आंदोलन करणाऱ्या लोकांचा विजय आहे’ असे म्हटले आहे. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय असल्याचेही ते पुढे म्हणाले. ‘सीजेपी’ आणि जेनरेशन झेड यांचे अभिनंदन करतानाच देशाच्या कानाकोपऱ्यातून उठून उभ्या राहिलेल्या सर्व नागरिकांचे आभारही त्यांनी मानले.

 

महत्त्वाचा घटनाक्रम…

20 जुलै : ‘सीजेपी’चा संसदेकडे मोर्चा, दगडफेकीनंतर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक विद्यार्थी-आंदोलक जखमी.

21 जुलै : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या निवासाबाहेर निदर्शने केल्याने वातावरण चिघळले.

23 जुलै : पंतप्रधान मोदींनी पेपरफुटीसाठी जलदगती न्यायालये आणि कठोर शिक्षेची घोषणा करत अनेक निर्णय घेतले.

24 जुलै : सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवसांपासूनचे उपोषण समाप्त केले.

25 जुलै : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जंतरमंतरवर जल्लोष, सीजेपीचे आंदोलनही मागे.

Comments are closed.