Finance Minister Ajit Pawar comment over social justice minister sanjay shirsat on fund diversion issue
छत्रपती संभाजीनगर – सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडे वळण्यात आला आहे. त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय खातेच बंद करुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शहराच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेले अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले. त्यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. येथील उद्योजकांना कोणी धमक्या देत असेल, खंडणी मागत असेल किंवा दादागिरी करत असेल त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. उपमुख्यमंत्र्यांनी भरउन्हात हातात छत्री घेऊन पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरातील जनसहयोग या संस्थेने उभारलेल्या संपुर्ण वन या वनवाटीकेला भेट दिली.

यावेळी त्यांनी विविध झाडांची जातीने माहिती घेतली. यातील अनेक झाडे ही बारामतीमध्ये नाहीत, त्यामुळे तिथे त्यांची लागवड करता येईल का, यासंबंधीची त्यांनी माहिती घेतल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले की, यंदा पाऊसमान चांगले आहे. राज्यात सरासरी 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील धरणांचा आणि पाणीसाठ्यांचा दर आठवड्याला आढावा घेतला जातो. संभाजीनगरमधील पाणी समस्येवर अजित पवारांनी महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना याबद्दल का विचारत नाही, असा उलट सवाल केला. तसेच पुढील बैठकीसाठी विभागीय आयुक्तांना बोलावून घेण्याच्या सूचना केल्या. राज्यात सर्वाधिक महागडे पाणीदर संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आहेत. सर्वाधिक पाणीपट्टी महापालिकेकडून आकारली जाते.
अजित पवारांनी येथील सारथी संस्थेचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. काम दर्जेदार झाले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा यंत्रणा व संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करा, असे सांगतानाच त्यांनी कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

समाजकल्याण खात्याचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. तर ते खातेच बंद करुन टाका अशी संतप्त प्रतिक्रिया या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी व्यक्त केली आहे, या प्रश्नावर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील. असे म्हणत त्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.
मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. त्यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत; अजित पवारांनी शब्द मागे घेतले
Comments are closed.