अजबच! हॉर्न वाजवून अस्वलाची झोपमोड केली म्हणून ठोठावला साडे पाच लाखांचा दंड
समजा, तुम्ही झोपलेला आहात आणि अचानक कानठळ्या बसवणाऱ्या हॉर्नचा आवाज आला तर? झोपमोड झाल्याने माणूस रागाराग करू शकतो, पण असाच प्रकार एखाद्या प्राणबद्दल झाला तर काय? याचे उत्तर मिळाले आहे. नॉर्वेतील स्वालबार्ड बेटांवर एका पर्यटकाने झोपलेल्या ध्रुवीय अस्वलाला उठवण्यासाठी जहाजाचा फॉग हॉर्न वाजवला. यामुळे अस्वलाची झोप तर मोडलीच, पण या खोडकरपणासाठी त्या व्यक्तीला तब्बल 5 लाख 25 हजारांची दंडाची भरपाई करावी लागली.
स्वालबार्ड द्वीपसमूह परिसरातून जाणाऱ्या एका जहाजावरील पर्यटकांना जमिनीवर शांतपणे झोपलेले एक ध्रुवीय अस्वल दिसले. उत्सुकतेपोटी एका व्यक्तीने जहाजाचा मोठा आवाज करणारा फॉग हॉर्न वाजवला. हॉर्नच्या तीव्र आवाजाने अस्वल दचकून जागे झाले आणि तिथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी निघून गेले. ही बाब समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर पाऊल उचलले. स्वालबार्डचे गव्हर्नर लार्स फॉसे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीवर 5 लाख 25 हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला. आरोपी व्यक्तीने आपला गुन्हा मान्य करत दंड भरण्यास संमती दिली आहे.
कडक नियम
- स्वालबार्ड परिसरात ध्रुवीय अस्वलांच्या संरक्षणासाठी अत्यंत कडक कायदे लागू आहेत. स्थानिक कायद्यानुसार ध्रुवीय अस्वलांना त्रास देणे, त्यांना चिथावणी देणे, आकर्षित करणे किंवा त्यांचा पाठलाग करणे पूर्णपणे बंदी आहे.
- स्वालबार्डमध्ये 1972 पासून ध्रुवीय अस्वलाला संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- पर्यटकांना आणि बोट चालकांना या वन्यजीवांपासून ठराविक सुरक्षित अंतर राखणे आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीत कोणताही हस्तक्षेप न करणे बंधनकारक आहे.
हवामान बदलाचे संकट
वाढत्या तापमानामुळे आणि बर्फ वितळल्यामुळे ध्रुवीय अस्वलांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. नुकत्याच आलेल्या वैज्ञानिक अहवालानुसार स्वालबार्डमधील अस्वलांची संख्या वाढत असल्याचे समोर आले होते. अशा परिस्थितीत केवळ मजेसाठी त्यांना त्रास देणे हा गंभीर गुन्ह्यांमध्ये मोडतो.
Comments are closed.