ओडिशातील सरकारी हॉस्पिटलला आग; 10 रुग्णांचा मृत्यू

11 कर्मचारी होरपळून जखमी : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाखाची भरपाई

वृत्तसंस्था/ कटक

ओडिशाच्या कटक येथील श्रीराम चंद्र भांजा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 रुग्णांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर 3 रुग्णांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे.

रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ट्रॉमा केयरच्या आयसीयूमध्ये ही आग लागली होती. येथे सुमारे 23 रुग्ण दाखल होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात रुग्णालयाचे कमीतकमी 11 कर्मचारी होरपळून जखमी झाले आहेत. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अनुमान आहे.

रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाने जलद पावले उचलत अनेक रुग्णांना सुरक्षित बाहेर काढले. तर आगीतून वाचलेल्या परंतु स्थिती गंभीर असलेल्या रुग्णांना त्वरित ‘न्यू मेडिसीन आयसीयू’मध्ये हलविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन वाहनांची मदत घेण्यात आली होती.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी सोमवारी सकाळी या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश त्यांनी दिला आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या परिवारांसाठी पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपये तर जखमींसाठी 50 हजार रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. श्रीराम चंद्र भांजा वैद्यकीय महाविद्यालय हे कटक येथील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे पूर्ण राज्यातून लोक उपचार करवून घेण्यासाठी येत असतात.

आयसीयूच्या एअर कंडिशनिंग सिस्टीम किंवा एखाद्या वैद्यकीय उपकरणात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे प्रारंभिक तपासात मानले जात आहे. सरकारने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रोटोकॉलच्या पालनात ढिसाळपणा करण्यात आला होता का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

Comments are closed.