उत्तराखंडमधील आर्मी कॅम्प स्टोअरला आग लागली

दुर्घटनेवेळी 100 हून अधिक सैनिक उपस्थित

वृत्तसंस्था/ चमोली

उत्तराखंडमधील सीमावर्ती जिल्हा चमोली येथील जोशीमठ भागात औली रोडवरील आर्मी कॅम्पमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. याप्रसंगी घटनास्थळी 100 हून अधिक सैनिक उपस्थित होते. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या दुर्घटनेत अनेक स्टोअर्स पूर्णपणे जळून खाक झाली. लष्कराचे कर्मचारी आग विझवण्याचा सतत प्रयत्न करत होते. जोशीमठ येथील आर्मी इंजिनिअरिंग कॉर्प्सच्या आवारात एका टिन-शेड इमारतीत भीषण आग लागण्याची ही घटना घडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आगीची माहिती मिळताच जोशीमठ अग्निशमन सेवा आणि आर्मी अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप कळलेले नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. इमारतीतील सामग्रीचे नुकसान झाल्याचे मूल्यांकन केले जात आहे.

Comments are closed.