अहमदाबादमधील व्यापारी संकुलात आग लागली

व्यायामशाळेत अडकलेल्या 25 जणांची सुटका

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमधील अहमदाबाद शहरात सोमवारी सकाळी ‘शांग्रीला-2 आर्केड’ या व्यावसायिक संकुलात आगीची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेदरम्यान चौथ्या मजल्यावरील व्यायामशाळेत अंदाजे 25 जण अडकले होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सकाळच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेनंतर सर्वच यंत्रणांची धावपळ उडाली. आगीत काही वाहने जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून घटनेच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

व्यावसायिक संकुलात असलेल्या तळमजल्यावरील बँकेच्या एटीएमजवळ आग लागल्याचे सांगण्यात आले. ही आग वेगाने पार्किंग क्षेत्र आणि वरच्या मजल्यांवर पसरल्याने धुराने संपूर्ण इमारत व्यापली होती. अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेने घटनास्थळी 38 अग्निशमन गाड्या पाठवल्या होत्या. मदत व बचावकार्यादरम्यान कॉम्प्लेक्समध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Comments are closed.