अरुणाचलमधील शाळेच्या वसतिगृहात आग लागली
दहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; तीन मुले जखमी
सर्कल/ इटानगर
अरुणाचल प्रदेशातील शि-योमी जिह्यात पापीक्रोंग सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात रविवारी पहाटे लागलेल्या आगीत 10 वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तसेच इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. पहाटेच्या सुमारास विद्यार्थी झोपेत असतानाच लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती समजताच मदत व बचावकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या पश्चिम सियांग जिह्यातील अलो येथील झोनल जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मोनिगोंग शहरापासून 17 किमी अंतरावर असलेल्या पापीक्रोंग गावात आगीची दुर्घटना घडली. हे गाव भारत-चीन सीमेवरील ताडाडेगे या शेवटच्या भारतीय लष्कराच्या चौकीजवळ असल्यामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री आणि स्थानिक आमदार पासांग दोर्जे सोना यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी प्राथमिक माहितीच्या आधारे ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.
Comments are closed.