Buldhana News – लोणार ग्रामीण रुग्णालयात आग, रुग्णाचा आगीत होरपोळून मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

बुलढाण्यातील लोणार ग्रामीण रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली. सोमवारी पहाटे 3.20 वाजण्याच्या सुमारास सामान्य रुग्णांच्या वॉर्डमध्ये ही आग लागली. या आगीत एक रुग्ण होरपळून मेला. हरिभाऊ बापुजी रोकडे असे मयत रुग्णाचे नाव आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

हरिभाऊ शहरातील बसस्थानकात रविवारी झोपलेले आढळल्यानंतर बसस्थानक वाहतूक नियंत्रकाने 108 नंबरवर फोन केला. यानंतर हरिभाऊ यांना लोणार ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करून त्यांना बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत कुणीही नातेवाईक नसल्याने पोलिसांना माहिती देत त्यांना ग्रामीण रुग्णालयातच ठेवण्यात आले.

रुग्णालयात रात्रीच्या वेळेस ड्युटीवर तैनात असलेले सुरक्षारक्षक उद्धव वाटसर यांना सोमवारी पहाटे रुग्णांच्या कक्षातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत रुग्णालयातील संबंधितांना कळवले. यानंतर शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. हरिभाऊ यांच्या बेडला आग लागून त्यात त्यांचा जळून मृत्यू झाला.

आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र हरिभाऊ यांना विडी ओढण्याचे व्यसन होते. त्यामुळे विडीमुळे आग लागली की शॉर्टसर्किट झालं याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

Comments are closed.