आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचे वक्तव्य

कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केले. आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याची मुक्ताफळे विखे पाटील यांनी उधळली आहेत.
पंढरपूर येथे एका सभेत भाषणादरम्यान विखे पाटील यांची जीभ घसरली. ते म्हणाले, सोसायटी काढायची, कर्ज काढायचे, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. याची चिंता नाही. महायुती सरकार 100 टक्के शेतकऱयांचे कर्ज माफ करणार आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
सरकारमधील मंत्री वारंवार कर्जमाफीबद्दल संभ्रम करणारी वक्तव्ये करीत आहेत. सत्तेवर असलेले मंत्री शेतकऱयांची थट्टा करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असेच वक्तव्य यापूर्वी केले होते. कर्ज दिल्यानंतर ते वेळेत फेडायची सवय लावा. सर्व फुकटात आणि सारखे माफ कसे होणार, असे पवार म्हणाले होते. या वक्तव्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती.
बावनकुळे यांच्याकडून सारवासारव
विरोधकांच्या टीकेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विखे पाटील यांच्या व्यक्तव्यावरून सारवासारव केली. ते म्हणाले, की विखे पाटील यांचे म्हणणे वेगळे होते. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन-तीन कर्जमाफी आपण केल्या. त्यानंतरही शेतकऱयांवर कर्ज होत आहे. पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याबद्दल विखे पाटील यांचे विधान होते, असे बावनकुळे म्हणाले.

Comments are closed.