स्वदेशी 'तेजस'चे पहिले उड्डाण यशस्वी

स्वदेशी ‘तेजस’चे प्रथम उ•ाण यशस्वी

► वृत्तसंस्था / नाशिक

भारताच्या अत्याधुनिक आणि स्वदेशी निर्मितीच्या ‘तेजस एमके 1 ए’ या युद्धविमानाने आपले प्रथम उड्डाण यशस्वी केले आहे. त्यामुळे युद्धविमाननिर्मितीच्या क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ प्राप्त करण्याच्या दिशेने भारताने भरारी घेतली आहे. भारताच्या या महत्त्वाच्या तंत्रवैज्ञानिक प्रगतीचे साक्षीदार म्हणून संरक्षणमंत्री राजनाथसिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते. या विमानाची बव्हंशी निर्मिती ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’च्या नाशिक येथील उत्पादन केंद्रात झालेली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याच कार्यक्रमात ‘एलएसी एम के 1 ए’च्या तिसऱ्या उत्पादन व्यवस्थेचे, तसेच ‘एचटीटी-40’ या विमानाच्या निर्मितीच्या दुसऱ्या व्यवस्थेचे उद्घाटनही केले. उद्घाटनानंतर त्यांचे या कंपनीचे तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यासमोर भाषणही झाले. त्यांनी ही विमाने निर्माण करुन भारताच्या सामरिक शक्तीत भर घालणाऱ्या सर्व तंत्रज्ञांचे आणि संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. ज्या नाशिकच्या भूमीत भगवान शिवशंकर त्र्यंबकेश्वराच्या रुपात वास्तव्य करतात, त्या भूमीत या विमानाची निर्मिती व्हावी, हा शुभ योगायोग आहे. ही विमाने भारताच्या संरक्षण आणि मारक क्षमतेत मोलाची भर टाकतील. नाशिकमधील या उत्पादन केंद्राने भारताच्या संरक्षण सामग्री निर्मितीच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. शत्रूचा विनाश करणाऱ्या भगवान शंकराप्रमाणे ही विमानेही शत्रूच्या छातीत धडकी भरवितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छाती फुगली गर्वाने

आज या क्षेत्रात मी जेव्हा भारत निर्मित तेजस विमान, सुखोई एसयु 30 विमान आणि एचआयटी-40 या विमानांना आकाशात झेप घेताना पाहिले, तेव्हा माझी मान अभिमानाने उन्नत झाली, तसेच छाती गर्वाने फुगली. एक वेळ अशी होती की, भारत आपल्या संरक्षणसिद्धतेसाठी जगातील इतर देशांवर अवलंबून होता. आपल्या संरक्षण सामग्रीच्या आवश्यकतेपैकी 70 टक्के सामग्री आपल्याला आयात करावी लागत होती. तथापि, गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने एका निश्चित योजनेच्या आणि निर्धाराच्या माध्यमातून संरक्षण सामग्री निर्मितीच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. आज आपण आपल्या आवश्यकतेच्या 75 टक्के संरक्षण सामग्री देशात उत्पादित करीत आहोत. हे यश समाधानकारक आहे, अशी भलावण राजनाथ सिंह यांनी केली.

संरक्षणसाधनांच्या निर्यातीत मोठी वाढ

दहा वर्षांपूर्वी भारताकडून होणारी संरक्षण सामग्रीची निर्यात 1 हजार कोटी रुपयांहूनही कमी होती. आज ही निर्यात 25 हजार कोटी रुपयांहून अधिकवर पोहचली आहे. हे आत्मनिर्भरता धोरणाचे मोठे यश आहे. या यशाने प्रेरित होऊन आम्ही 2029 पर्यंत देशात 3 लाख कोटी रुपयांच्या शस्त्रनिर्मितीचे ध्येय ठेवले आहे. तसेच 50 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचेही लक्ष्य समोर ठेवले आहे. आमच्या प्रगतीचा वेग पाहता ही दोन्ही ध्येये साध्य होतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Comments are closed.