प्रथम युद्ध, नंतर पदवी

सिंदूर अभियानात सैनिकांचा असाही पराक्रम

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पेलेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी हाती घेतलेल्या सिंदूर अभियानात भारताच्या वायुदलाने साकारलेला पराक्रम सर्वांना माहीत आहे. तथापि, भारताच्या सीमा सुरक्षा दलानेही या अभियानात महत्वाची भूमिका केलेली आहे.

या दलाच्या 167 प्रशिक्षणार्थींनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच या अभियानात सहभागी होऊन एक नवा इतिहास रचला आहे. अशा 167 प्रशिक्षणार्थी सैनिकांनी या संघर्षात पराक्रम गाजविला आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतात घुसखोरी करु नये, म्हणून या 167 प्रशिक्षणार्थी सैनिकांना अभियानाच्या काळात सीमेवर पाठविण्यात आले होते. त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांवर जोरदार गोळीबार करुन त्यांना जागच्या जागी जखडून ठेवले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रतिकाराला खीळ बसली होती. या सर्व 167 सैनिकांनी शनिवारी आपले प्रशिक्षण पूर्ण करुन पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांनी आधी पराक्रम गाजवला आणि नंतर पदवी प्राप्त केली आहे. पदवीदान समारंभात या घटनेचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला आहे. हे अभियान भारताने 7 मे 2025 या दिवशी हाती घेतले.

अतिदक्षतेचा आदेश

अभियानात मुख्य भूमिका वायुदलाचीच होती. तथापि, पाकिस्ताने भारतावर भूमीच्या मार्गाने आक्रमण करु नये, म्हणून सीमेवर पूर्ण दक्षता घेण्यात आली होती. सीमा सुरक्षा दलाच्या सर्व सीमावर्ती तुकड्यांना अतिदक्षतेत राहण्याचा आदेश देण्यात आला होता. या 167 प्रशिक्षणार्थी सैनिकांनाही इतर सैनिकांसमवेत सीमेवर नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे या सैनिकांना त्याचे प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच सशस्त्र संघर्षाचा अनुभव मिळाला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed.