आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल, जाणून घ्या कधी रंगणार किताबाची लढत?
सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने गुरुवारी, 25 सप्टेंबर रोजी बांगलादेशवर 11 धावांनी विजय मिळवून आशिया कप 2025च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. यासह, जेतेपदाच्या लढतीसाठी मैदान तयार झाले आहे. आशिया कप 2025चा अंतिम सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील. आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान कधीही आशिया कपच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर आलेले नाहीत. भारताने आठ वेळा आशिया कप जिंकला आहे, तर पाकिस्तानने दोनदा स्पर्धा जिंकली आहे.
आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली होती, ज्यामध्ये भारताने पहिल्या हंगामात श्रीलंकेला हरवून विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर, टीम इंडियाने 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेतेपद जिंकले. 2016 आणि 2018 वगळता, उर्वरित हंगामात भारताने श्रीलंकेला जेतेपदाच्या सामन्यात हरवले, तर त्या दोन वर्षांत टीम इंडियाने बांगलादेशला हरवले.
दरम्यान, पाकिस्तानने 2000 मध्ये श्रीलंकेला आणि 2012 मध्ये बांगलादेशला हरवून ट्रॉफी जिंकली. गेल्या 13 वर्षांपासून पाकिस्तान आशिया कपचे जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आता, त्यांना भारताकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानला दोनदा पराभूत केले. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला 7 विकेट्सने आणि सुपर 4 मध्ये 6 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे, टीम इंडिया 2025 च्या आशिया कपच्या अंतिम फेरीसाठी फेव्हरिट असेल. हे मात्र नक्की.
Comments are closed.