कर्जत, खोपोलीकरांचा आज लटकवार; प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी पाच तासांचा विशेष ब्लॉक
‘मरे’ प्रवाशांच्या नशिबी दर रविवारी मेगाब्लॉक असताना आज शुक्रवारी कर्जत स्थानकावर पाच तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक असून ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. या विशेष ब्लॉकमुळे आजचा शुक्रवार कर्जत, खोपोलीकरांसाठी लटकवार ठरणार आहे. सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत ब्लॉक असल्याने कर्जत, खोपोलीमधील प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
कर्जत यार्डच्या पुनर्रचनेचे काम गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. त्यासाठी तंत्रज्ञ, कुशल कामगार आणि अधिकारी यांचा ताफा तैनात करण्यात आला असून शुक्रवारी प्री नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पाच तासात पूर्ण करण्याचे आव्हान असून ते ठरलेल्या वेळेआधीच पूर्ण करू असा निर्धार रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उद्या होणारा शेवटचा विशेष ब्लॉक असून त्यानंतर सर्व तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत.
येथे आहे ब्लॉक
शुक्रवारी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. भिवपुरी स्थानक-जांबुंग केबिन-ठाकूरवाडी-नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकादरम्यान हा ब्लॉक असेल. या कालावधीत कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहील असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
दुपारी १२, दुपारी १.१५ आणि दुपारी ३.३९ वाजता सुटणाऱ्या कर्जत ते खोपोली लोकल रद्द करण्यात येतील.
सकाळी ११.२०, दुपारी १२.४० आणि दुपारी २.५५ वाजता सुटणाऱ्या खोपोली ते कर्जत लोकल रद्द होणार आहेत.
दुपारी १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात येईल. कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत येथून नियोजित वेळेत चालवण्यात येणार आहे. मात्र खोपोली ते कर्जतदरम्यान लोकल सेवा बंद राहील
Comments are closed.