सरकारने गंडवलं! पाच लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र
राज्याच्या तिजोरीत खडखडाट होऊ लागल्याने आता महायुती सरकारने नियमांवर बोट ठेवत लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळय़ाच महिला या सरकारच्या लाडक्या होत्या. मात्र निवडणूक सरल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींना गंडवले असून एकाच फटक्यात पाच लाख महिलांना अपात्र ठरवून या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
लोकसभा निवडणुकीत महिला वर्गाच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवत राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. आतापर्यंत सात हप्ते लाभार्थींच्या खात्यात जमाही झाले. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला यश मिळाले. निवडणूक डोळय़ासमोर असल्याने महायुती सरकारने कोणतीही शहानिशा न करता सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. पण सध्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्यामुळे या योजनेतील महिलांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने निकषात न बसणाऱया पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांत लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही, असा खुलासा करत अदिती तटकरे यांनी अपात्र ठरलेल्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणाला वगळले
- n संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी – 2 लाख 30 हजार
- n वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1 लाख 10 हजार
- n कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱया महिला – 1 लाख 60 हजार
2100 रुपयांचे गाजर
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या योजनेची रक्कम दीड हजारावरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप याची घोषणा झालेली नाही. आता हे वाढीव 2100 रुपये कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. पुढच्या महिन्यात राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी या योजनेची घोषणा होऊ शकते.
Comments are closed.