गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, आदित्य ठाकरे यांची मागणी
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, गणेश मंडळांना ऑनलाइन परवानग्या घेताना येणाऱया अडचणी दूर करा, गणेशमूर्तींना अडथळा ठरणाऱया ओव्हरहेड वायर्स तातडीने हटवा, अशा मागण्या आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गणेशोत्सवासंदर्भात झालेल्या समन्वय बैठकीत केल्या.
गणेशोत्सव उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज जी-दक्षिण महानगरपालिका वॉर्डात समन्वय बैठकीला उपस्थित राहून सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर व अन्य अधिकाऱयांशी चर्चा केली. वरळी मतदारसंघातील रस्त्यांवर असलेले खड्डे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेडसवणाऱया अडचणी, त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, ऑनलाइन परवानग्या आदी विषय या बैठकीत होते. या बैठकीला आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेवक निशिकांत शिंदे, हेमांगी वरळीकर, पद्मजा चेंबूरकर, आबोली खाडये, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, पोलीस, वाहतूक विभाग, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी दहा दिवस उपोषणाला बसले आहेत, सर्व राजकीय पक्षांनी त्यांची दखल घेतली आहे, पण सत्ताधारी आणि मुख्यमंत्री मात्र आपल्याच भावविश्वात रममाण आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पोलीस कॅम्पमध्ये स्वच्छता व डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का होत नाही? कारण सरकारकडे कंत्राटदारांना द्यायला पैसेच राहिलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
आमचे रिपोर्ट कार्ड जनता ठरवते
प्रजा फाऊंडेशनने आज मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड दिले. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता, आमचे रिपोर्ट कार्ड जनता ठरवते असे आदित्य ठाकरे म्हणाले. रिपोर्ट कार्ड येणे चांगले आहे, आमदारांच्या कामाचे ऑडिट या संस्थांकडून आणि जनतेकडूनही झाले पाहिजे, आपले लोकप्रतिनिधी काय करताहेत हे प्रश्न जनतेने विचारलेच पाहिजेत, असे ते म्हणाले.
मार्गातील अनधिकृत ओव्हरहेड वायर्स हटवा
बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. इतर मुद्दय़ांप्रमाणेच ओव्हरहेड वायर्सचा मुद्दा आपण या बैठकीत मांडला. सर्व मुंबईत ओव्हरहेड वायर्स वाढू लागल्या आहेत. त्यातील बहुतांश अनधिकृत आहेत. कुठून येतात कुणालाच माहीत नसते. याशिवाय एल शेप सिग्नलही काही मार्गावर आहेत. गणेशमूर्तींच्या सुरक्षेचा विचार करून या ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नलबाबत तातडीने तोडगा काढावा असे आपण सांगितल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
Comments are closed.