स्पाइसजेटचा सावळागोंधळ सुरूच; मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या विमानाला सहा तास विलंब, प्रवासी हैराण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्पाइसजेट एअरलाईन्सचा सावळागोंधळ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाला. दिल्ली विमानतळावर विमानातील एसी बंद झाल्याने दोन तास प्रवाशांचे स्पाइसजेटच्या विमानात प्रवाशांचे हाल झाले. यानंतर एअरलाईन्सच्या या भोंगळ कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानात तीन तास प्रवासी अडकले.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, स्पाइसजेटचे SG815 हे विमान गुरुवारी दुपारी 12 वाजता मुंबईहून गोव्याला रवाना होणार होते. मात्र तीन तास विमानतळावर वाट पाहिल्यानंतर प्रवाशांना विमानात बसवण्यात आले. त्यानंतर आणखी तीन तास प्रवाशांना विमानाच्या उड्डाणाची वाट पहावी लागली. एकूण सहा तास प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले होते. यादरम्यान प्रवाशांना अन्न किंवा अल्पोपहार देखील पुरवला गेला नाही, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

नताशा देसाई लवंडे या महिलेने इन्स्टाग्रामवर स्पाइसजेटचा अनुभव शेअर केला आहे. विलंबकाळात जेव्हा प्रवाशांनी क्रू मेंबरकडे अल्पोपाहाराबाबत विचारणा केली असता अल्पोपहार पुरवणे ही विमान कंपनीची बंधनकारक जबाबदारी नाही, असे उत्तर देण्यात आले. हेच विमान आधी दिल्लीहून आले होते आणि तिथेही प्रवाशांना अन्नाशिवाय जवळपास दोन तास विमानातच बसवून ठेवण्यात आले होते, असे नताशा यांनी नमूद केले आहे.

Comments are closed.