सौदी अरेबियाची उड्डाणे तात्पुरती रद्द केली

सुरक्षा परिस्थितीमुळे एअरलाईन्सची सावधगिरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सौदी अरेबियातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांसाठीची आपली उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगो आणि अकासा एअरनेही काही मार्गांवरील नियोजित उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. या रद्द झालेल्या उड्डाणांमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळेल. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी केलेल्या प्रवासी निवेदनामध्ये विमान कंपन्यांनी रियाध, जेद्दाह आणि दम्माम यांसारख्या प्रमुख सौदी शहरांमधील उड्डाणे वेगवेगळ्या तारखांसाठी रद्द केल्याची माहिती जारी केली. याव्यतिरिक्त काही विमान कंपन्यांनी मदिनासाठीची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

सौदी अरेबियातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रियाध, दम्माम आणि जेद्दाह येथून येणारी व जाणारी त्यांची सर्व उड्डाणे 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत रद्द केली जातील, असे एअर इंडियाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे, एअर इंडिया एक्स्प्रेसने दम्माम, जेद्दाह आणि रियाध येथून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानसेवा 20 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केल्या आहेत. कंपनी या भागातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्या विमानसेवांमध्ये बदल करेल, असे सांगण्यात आले. रद्द झालेल्या विमानांतील प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या तारखा बदलण्याचा किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय संपूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. अकासा एअरने रियाध येथून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानसेवा 24 ऑक्टोबरपर्यंत आणि जेद्दाह येथून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानसेवा 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केल्या आहेत, असे एअरलाईनने जाहीर केले आहे.

Comments are closed.