पालकमंत्र्यांना पूरग्रस्तांचा घेराव, नांदेडच्या हसनाळ गावात अतुल सावे यांचा ताफा अडवला; लंडन पर्यटनानंतर ‘सरकार’ जागे झाले

ढगफुटीसदृश पावसाने नांदेडच्या मुखेडमधील हसनाळ गाव होत्याचे नव्हते झाले. माणसे मृत्युमुखी पडली. परिसरातील सात गावे आणि तेथील पिके पाण्याखाली गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले. असे असताना मदतीचा छदामही पूरग्रस्तांना मिळाला नाही. उलट पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण लंडनमध्ये पर्यटनात मग्न होते. आज तब्बल सात दिवसांनंतर हसनाळमध्ये आलेल्या पालकमंत्र्यांचा ताफा पूरग्रस्तांनी अडवला आणि घेराव घालत सरकारविरोधात घोषणा दिल्या.
16 ऑगस्ट रोजी रात्री व 17 ऑगस्ट रोजी या भागात प्रचंड पाऊस झाल्याने लेंडी धरणाचे दरवाजे पूर्वसूचना न देता उघडल्याने रावणगाव, भिंगोली, हसनाळ आदींसह सात गावांमध्ये पाणी शिरले. प्रकल्पाजवळील हसनाळ व रावणगावचे अतोनात नुकसान झाले. घळभरणीचा निर्णय घाईत घेतल्याने व अतिवृष्टीने हा भयंकर प्रकार घडला. आजही या गावांतील अनेक लोक निवारा केंद्रात आहेत. सात दिवस झाल्यानंतरही पूरग्रस्तांना मदतीचा छदामही मिळाला नाही. मुक्रमाबाद सर्कलमधील बारा गावांतील पिके पूर्णत उद्ध्वस्त झाली. त्यांच्या पंचनाम्याचाही पत्ता नाही. त्यामुळे नागरिक, महिला संतप्त झाल्या आहेत.
15 ऑगस्टच्या झेंडावंदन कार्यक्रमानंतर पालकमंत्री लंडन येथे एका खासगी वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळय़ास रवाना झाले. एवढी भयंकर घटना घडल्यानंतर त्यांनी माघारी फिरून पूरग्रस्तांच्या भेटीस यायला हवे होते. मात्र तब्बल सात दिवसांनंतर लंडनहून परतलेले पालकमंत्री अतुल सावे व माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण या भागात आले. त्या ठिकाणी त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले.
पूरग्रस्त गाडीसमोर आडवा
पालकमंत्री अतुल सावे हे हसनाळ गावात येताच पूरग्रस्तांनी प्रचंड घोषणाबाजी करून शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला तसेच त्यांचा गावाबाहेरच ताफा अडकण्यात आला. एक पूरग्रस्त पालकमंत्री यांच्या गाडी समोर अडका पडून न्याय मिळेपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा चंदू थोटके यांनी घेतला. याकेळी पोलिसांनी चंदू थोटके यांना समजावून सांगून बाजूला केले.
संसार उद्ध्वस्त झाल्यावर गायब का झालात?
आमचे जीवन उद्ध्वस्त झाले, शासनाचे अनुदान आम्हाला मिळाले नाही, घळभरणीचा निर्णय घेताना गावकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे तिडके नावाच्या कार्यकारी अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करत प्रचंड घोषणाबाजी करून गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवली. त्यांच्यासोबत असलेले आमदार तुषार राठोड यांनाही पूरग्रस्तांनी जाब विचारला आणि प्रशासनाचा निषेध केला. आमचे संसार उघड्यावर पडले असताना तुम्ही गायब का झालात, असा संतप्त सवाल करताच सर्व जण निरुत्तर झाले.
Comments are closed.