बिहारच्या सात जिल्ह्यांमधील पूर परिस्थिती
10 लाख लोकांना फटका : हिमाचलमध्ये 360 हून अधिक रस्ते बंद, उत्तराखंडमध्ये 1000 लोकांची सुटका
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश-बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील 7 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले असून 10 लाख लोक बाधित झाले आहेत. गंगासह बिहारमधील 10 नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. या आपत्तीमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. 13 ऑगस्टपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होईल. यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातही सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुरादाबादमध्ये रामगंगा नदी वाहत आहे. रविवारी एक दुचाकीस्वार त्यात वाहून गेल्यानंतर 22 तास झाडावर अडकून पडला होता. सोमवारी त्याला वाचवण्यात आले. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशातील 54 जिह्यांमध्ये 5.9 मिमी पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशात पाऊस थांबला आहे. ढगफुटीची घटना घडलेल्या उत्तराखंडमधील धराली आणि हर्षिलमध्ये लोकांना अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. येथे बचावकार्य सुरू आहे. लोकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 1 हजार लोकांना वाचवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर एनएच-305 चा औट-सैंज रस्ता बंद आहे. राज्यातील 360 हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या हंगामात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 116 लोकांचा मृत्यू झाला आहे. 37 लोक अजूनही बेपत्ता आहेत. रविवारी 20 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिह्यातील शिलाईला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर सोमवारी सकाळी एक मोठी टेकडी रस्त्यावर कोसळली. त्यात एक टिप्पर आणि आयुष विभागाचे वाहन अडकले. दोन्ही वाहनांचे चालक थोडक्यात बचावले.
Comments are closed.