अटींमध्ये सुधारणा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष द्यावे; शरद पवार यांचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीची बैठक आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह अनेक मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. सरकारने कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष द्यावे, अस सल्ला त्यांनी दिला आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत ते म्हणाले की, आज इंडिया आघाडीची बैठक आहे. आम्ही पुन्हा आठ दहा दिवसांनी प्रमुख नेत्यांना बोलवून त्यातून मार्ग काढू. मार्ग निघेल याची खात्री आहे. आजची आढावा मिटिंग आहे. या बैठकीत कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असं सूत्र ठरवलं जाणार आहे.
आता आगामी तीन वर्षे निवडणुका नाही. त्यामुळे सर्वांना सोबत ठेवायचं आहे. सरकारनेही सर्वांना सोबत घेत काम करण्याची गरज आहे. कर्जमाफीच्या अनेक अटी अडचणीच्या आहेत. लोकशाहीत सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणं आवश्यक असतं. मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलून कर्जमाफीचा जो निर्णय घेतला, त्यातील अटी कशा दुरुस्त होतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
केळी आणि ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तज्ज्ञांची एक टीम आम्ही पाठवली होती. वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यांनी पाहणी केली. काय करायची गरज आहे, याचे लेखी निवेदन आमच्याकडे आलं आहे. त्याबाबत आढावा घेत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.