आयपीएल 2026 आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव बदलणार? अनन्या बिर्लाने दिले स्पष्टीकरण

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) नाव बदलणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आरसीबी १६७०० कोटी रुपयांना विकली गेल्याने चाहत्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. १९ व्या आयपीएल हंगामाआधी आरसीबीला आदित्या बिर्ला ग्रुपने विकत घेतले आहे. त्यामुळे हे नवे मालक संघाचे नाव बदलणार, असे म्हटले जाऊ लागले. त्याला अनन्या बिर्लाने स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे हे सांगितले आहे.

आरसीबीच्या मालकी आणि नेतृत्वामुळे अनन्या बिर्ला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा भाऊ आर्यमन बिर्ला याची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. संघाच्या मालकी किंवा व्यवस्थापनात अनन्याचा थेट सहभाग नाही, मात्र तिच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे ही चर्चा होत आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत संघाचे नाव बदलले जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे.

अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “आरसीबी १६,७०५ कोटी रुपयांना विकली गेली. आदित्या बिर्ला ग्रुप, डेव्हिड ब्लिट्झर आणि ब्लॅकस्टोन यांचा समावेश असलेल्या एका संघाने आरसीबी विकत घेतली आहे. चांगली बातमी ही आहे की, आदित्य बिर्ला ग्रुपने ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ हे नाव कायम राहिल याची पुष्टी केली आहे.”

मंगळवारी (२४ मार्च) पार पडलेल्या या व्यवहारामध्ये आदित्य बिर्ला ग्रुपच्या (एबीजी) नेतृत्वाखालील एका संघाने आरसीबीच्या फ्रॅंचायजीचा १०० टक्के इक्विटी हिस्सा, सध्याची मालक कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून तब्बल १.७८ अब्ज डॉलर्स ( अंदाजे १६,७०६ कोटी रुपये) मध्ये विकत घेतला.

आरसीबी आयपीएलच्या २००८ च्या पहिल्या हंगामापासून लीगचा भाग आहे. या विक्रीमुळे आरसीबी आतापर्यंतचा सर्वात महागडा आयपीएल संघ बनला आहे. फ्रॅंचायजीच्या या व्यवहारामध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही संघांचा समावेश आहे.

२०२५ मध्ये पुरुष संघाने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच महिला संघाने २०२६ आणि २०२४ मध्ये महिला आयपीएलचे म्हणजे वूमन प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) विजेतेपद जिंकले आहेत.

Comments are closed.