स्वातंत्र्यानंतर प्रथमच रसायनीच्या कोरलवाडीला मिळाले शुद्ध पाणी, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या आंदोलनाला यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रसायनीतील कोरलवाडीला स्वातंत्र्याच्या तब्बल 79 वर्षांनंतर पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेविरोधात ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने आंदोलनाचा दणका दिल्यानंतर सरकारला जाग आली आणि प्रलंबित कामे मार्गी लावत या कोरलवाडीला पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला.

कोरलवाडीसाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना तीन वर्षे अपूर्ण राहिल्याने संतप्त झालेल्या आदिवासी भगिनींनी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 26 फेब्रुवारी 2026 पासून रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बेबी वाघे (46) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर आमदार नितीन राऊत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने काम सुरू करीत पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच उर्वरित तांत्रिक कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशा आशयाचे लेखी पत्र कार्यकारी अभियंत्यांचे वरिष्ठ सहाय्यक रवींद्र सोनारघरे, रुपेश राजगे, कनिष्ठ सहाय्यक संकिता पाटील, चैताली म्हात्रे यांनी दिले. त्यामुळे तहानलेल्या येथील गावकऱ्यांनी जलोष करत आपले आंदोलन मागे घेतले.

कोरलवाडीत जरी पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचले आहे. मात्र रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे 1200 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील. रायगडमध्ये अजून शेकडो आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत.
संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

Comments are closed.