वनडे वर्ल्ड कपसाठी महिला क्रिकेट संघ जाहीर! शेफाली वर्मा झाली संघाबाहेर, 'या' युवा खेळाडूंना मिळाली संधी
भारतात होणाऱ्या महिला वनडे विश्वकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर हिला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. विकेटकीपर म्हणून ऋचा घोषवर विश्वास ठेवण्यात आला आहे.
डिसेंबरमध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रतिका रावलला देखील संघात स्थान देण्यात आले आहे. त्यासोबतच अमनजोत कौरचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, शेफाली वर्माला संघातून वगळत सिलेक्टरांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
महिला वनडे विश्वकप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेफाली वर्मा निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरली असून तिचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. ओपनर म्हणून प्रतिका रावलची निवड झाली आहे आणि ती स्मृती मंधानासोबत खेळताना दिसणार आहे.
प्रतिकाने आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ केला आहे. तिने 54 च्या सरासरीने 703 धावा केल्या आहेत. हाच कारणास्तव निवडकर्त्यांनी प्रतिकाला प्राधान्य दिले आहे. हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर म्हणून ऋचा घोष पहिली पसंती असेल, तर बॅकअप म्हणून यास्तिका भाटियाला स्थान देण्यात आले आहे.
गोलंदाजीमध्ये निवडकर्त्यांनी वेगवान माऱ्याची जबाबदारी रेणुका सिंह ठाकूर हिच्यावर सोपवली आहे. अरुंधती रेड्डीलाही संघात स्थान देण्यात आले आहे. फिरकीपटू म्हणून राधा यादव आणि स्नेह राणा यांच्यावर निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला आहे. भारतीय संघाकडून केवळ 8 वनडे सामने खेळलेल्या श्री चरणीलाही स्क्वॉडमध्ये संधी मिळाली आहे. दीप्ती शर्मा मात्र बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये धमाल करताना दिसणार आहे.
Comments are closed.