या मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कर्णधार असणार दिनेश कार्तिक, 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार सामने

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा माजी विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसणार आहे. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी दिनेश कार्तिकची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजकांनी मंगळवारी स्वतः ही माहिती दिली.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा यावर्षी 7 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. अजून भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. आयोजकांनी फक्त कर्णधाराची घोषणा केली आहे. यापूर्वी बातमी आली होती की दिनेश कार्तिक या स्पर्धेत भारताचा कर्णधार असेल. आता आयोजकांनी याची अधिकृत पुष्टी केली आहे.

कर्णधारपद मिळाल्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाले, “हाँगकाँग सिक्सेसमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला इतक्या उत्कृष्ट खेळाडूंंसोबत खेळण्याची उत्सुकता आहे. आम्ही निर्धास्त आणि मनोरंजक क्रिकेट खेळू.”

क्रिकेट हाँगकाँग चायना चे अध्यक्ष बुर्जी श्रॉफ म्हणाले, “हाँगकाँग सिक्सेस 2025 साठी दिनेश कार्तिकला टीम इंडियाचा कर्णधार नियुक्त करून आम्ही रोमांचित आहोत. त्यांचे नेतृत्व आणि प्रचंड अनुभव संघासाठी खूप उपयुक्त ठरेल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांचे आकर्षण निश्चितच वाढेल, याची आम्हाला खात्री आहे.”

2004 साली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकने 2022 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दिनेश कार्तिकने भारतासाठी 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत त्यांच्या नावावर 1025 धावा, एकदिवसीय सामन्यांत 1752 धावा तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 686 धावा आहेत. त्याने 257 आयपीएल सामनेही खेळले असून या काळात त्यांनी 4842 धावा केल्या.

दिनेश कार्तिकने आयपीएल 2008 पासून सातत्याने अनेक संघांसाठी खेळ केले. त्यांनी आयपीएलमधील आपला शेवटचा सामना 2024 मध्ये खेळला. दिनेश कार्तिकने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील SAT20 लीगमध्येही खेळ केला होता आणि या लीगमध्ये त्यांनी फलंदाजी करताना अनेक उपयुक्त खेळी साकारल्या होत्या.

Comments are closed.